कोगे-कुडित्रे पुलाच्या भरावाने वाकरे, कुडित्रेकर पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:42+5:302021-08-02T04:09:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कोगे-कुडित्रे पुलाच्या भरावाने पाण्याला मोठा बांध घातल्यासारखी स्थिती झाली आहे. या पुलाला भराव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोगे-कुडित्रे पुलाच्या भरावाने पाण्याला मोठा बांध घातल्यासारखी स्थिती झाली आहे. या पुलाला भराव टाकण्याऐवजी दोन्ही बाजूंना मोठ्या मोऱ्या ठेवल्या असत्या, तर कुडित्रेसह तुळशी व कुंभी या नद्यांच्या काठांवर असणाऱ्या गावांत पुराचे पाणी शिरले नसते. अशीच परिस्थिती शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे काढले नसल्याने होऊन भोगावती नदीकाठांवर असणाऱ्या दोनवडे-वाकरे या गावांत पाणी शिरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी बोलून दाखविला आहे.
डौलदार पिके व दिमाखदार घरे ही करवीर तालुक्यातील अनेक गावांची ओळख आहे. यात वाकरे, दोनवडे, कुडित्रे या तीन गावांना कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या सान्निध्याने सामाजिक, राजकीय व शैक्षणिक श्रीमंतीत भर पडली आहे; यामुळे येथे ग्रामीण संस्कृती व शहरी झगमगाट पाहायला मिळतो; पण गेल्या तीन वर्षांत दोन वेळा महापूर आल्याने पहिल्या महापुरातून सावरताना दुसऱ्यांदा आलेल्या महापुराने संसार विस्कटल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडत आहे.
वाकरे येथे महापुराचे पाणी पोवार गल्लीपर्यंत येईल; तसेच २०१९च्या पुराच्या रेषेतच पुराचे पाणी राहील, असा ग्रामस्थांचा अंदाज होता; पण तोरस्कर गल्लीसह वाकरेपैकी पोवारवाडी येथे पुराचे पाणी शिरल्याने १५० कुटुंबांना जनावरांसह, अंगावरील कपड्यांसह स्थलांतरित व्हावे लागले. यात दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत; तर आठ ते दहा घरांची पडझड झाली आहे. पूर ओसरू लागला आहे तसतशा पुरातील नुकसानीच्या भयावह दृश्यांनी ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकाश विठ्ठल पाटील यांचे दुमजली व आनंदा पांडुरंग पाटील यांचे तीनमजली राहते घर पडले असून १५ ते १६ घरांची मोठी पडझड झाली आहे. ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कुडित्रे-कोगे येथे पुलाच्या आजूबाजूला किमान १० फुटांनी भराव टाकण्यात आला आहे; यामुळे महापुराच्या पाण्याची पातळी वाढून पाण्याचा निचरा न झाल्याने कुडित्रे येथील कुंभार गल्लीत पाणी शिरले. १०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते. ८ ते १० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती दोनवडे येथे झाली होती. दोनवडेतील ६५ टक्के नागरी वस्तीत पाणी शिरल्याने सात ते आठ घरांची पडझड झाली.
कुडित्रे-कोगे पुलाचा तसा कोणताच फायदा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात हा पूल वाहतुकीला सुरू झाल्यापासून अनेक दिवस पाण्याखाली असतो. पुलाला भराव टाकल्याने वाकरे, कुडित्रे ही गावे व शेती पाण्याखाली जात असून लाखोंचे नुकसान होत आहे.
संजय पाटील (वाकरे)
वाकरे (ता. करवीर) येथे आनंदा पांडुरंग पाटील यांचे दुमजली घर जमीनदोस्त झाले.