आंतरराज्य प्रवाशांसाठी कोगनोळी नाका ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:33 AM2021-02-26T04:33:57+5:302021-02-26T04:33:57+5:30

कोल्हापूर: आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी नाका हा प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. कोरोनापेक्षाही या नाक्यावर कर्नाटक प्रशासनाकडून ...

Kognoli Naka is a headache for interstate passengers | आंतरराज्य प्रवाशांसाठी कोगनोळी नाका ठरतोय डोकेदुखी

आंतरराज्य प्रवाशांसाठी कोगनोळी नाका ठरतोय डोकेदुखी

googlenewsNext

कोल्हापूर: आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी नाका हा प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. कोरोनापेक्षाही या नाक्यावर कर्नाटक प्रशासनाकडून होणारी अडवणूूकच जास्त भयंकर असल्याचा अनुभव लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गेल्या अकरा महिन्यात लाखो लोकांनी घेतला आहे.

येथील वर्तणूक पाहिली की, महाराष्ट्रातून येणारे जणू पाकिस्तानातूनच येत आहेत, इतक्या चौकशांच्या जंजाळात अडकवून नाकात दम आणला जातो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रचंड त्रास सहन करावा लागल्यानंतर आणि दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे भोग या नाक्यावर सुरू झाले आहेत.

आशियाई महामार्ग क्रमांक १४७ हा देशाच्या सुवर्णचतुष्कोन योजनेतील महत्त्वाचा मार्ग दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या देशाच्या चारही महत्त्वाच्या शहरांना एका चौकाेनात जोडणारा हा महामार्ग देशांतर्गत वाहतुकीत सर्वात सोयीस्कर आहे. पण गेल्यावर्षी कोरोनामुळे लादलेल्या लॉकडाऊनचे निमित्त झाले आणि हा रस्ता म्हणजे राज्याची खासगी मालमत्ताच आहे, अशा अविर्भावात त्याचा वापर सुरू झाला. कागल व निपाणीच्या मध्ये असलेल्या या कोगनोळी फाट्यावर नाका स्थापन करून तब्बल दोन-अडीच महिने हा रस्ता रोखून धरण्यात आला. कर्नाटकमध्ये बाहेरील राज्यातील लोकांना अजिबात प्रवेश द्यायचा नाही, अशी भूमिका घेत आपल्याच देशातील नागरिकांना येथे वेठीस धरले. कुटुंबासह उन, वारा, पाऊस झेलत कुटुंब दोन-चार दिवस गाडीतच बसून राहिले. कर्नाटक सरकारच्या या दंडेलशाहीविरोधात पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी गेल्या, तरी यात फरक पडला नाही.

या कटू अनुभवाचे साक्षीदार असणाऱ्यांना नऊ महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा या अनुभवाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे, असे सांगत नाक्यावर गेल्या सोमवारपासून तपासणी नाका सुरू करण्यात आला आहे. कर्नाटक वगळता इतर राज्यांच्या पासिंगच्या गाड्या दिसल्या की पोलीस अडवून त्यांना एन्ट्री करण्यापासून रोखत आहेत. गाडीतील संपूर्ण प्रवाशांचे स्वॅब तपासणीचा अहवाल असल्याशिवाय पुढे सोडले जात नाहीत. या कारणामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

चौकट ०१

महाराष्ट्राची बंद, कर्नाटकची एसटी मात्र सुरू

या नियमामुळे सार्वजनिक वाहतूक असलेल्या एसटीच्या कर्नाटकात जाणाऱ्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. याउलट कर्नाटकातून महाराष्ट्रातील फेऱ्या मात्र विनाअडथळा सुरू आहेत. गडहिंग्लज, चंदगड आगाराच्या तुरळक फेऱ्या सुरू आहेत.

चौकट ०२

सीमाभागातील जनता वेठीस

कोगनोळी गाव उत्तर कर्नाटकातील शेवटचे व सीमाभागातील महत्त्वाचे गाव आहे. याच्या उजव्या बाजूला महाराष्ट्र राज्यातील गावांची संख्या जास्त आहे. कागल, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यांच्या सीमा कर्नाटकला लागून आहेत. त्यामुळे या तालुक्यातील गावांचा रोजचा संबंध कर्नाटकातील गावांशी येतो. पण वारंवार नियम लादून या जनतेला वेठीस धरले जाते.

चौकट ०३

एकही पाॅझिटिव्ह अहवाल नाही

नाक्यावरील या केंद्रावर पोलीस, आरोग्य कर्मचारी यांचे ५० जणांचे पथक तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. अजून पाच दिवस हा नाका सुरू राहणार आहे, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. रोज ३०० च्या वर गाड्यांची तपासणी होत आहे. विशेष म्हणजे नाका सुरू झाल्याच्या चार दिवसात एकही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही.

चौकट ०४

२ किलोमीटरसाठी १० किलोमीटरचा फेरा

बॅरिकेट्‌स लावून महामार्गच अडवून ठेवण्यात आल्याने वाहनधारकांकडून गावा-गावातून जाणारा पर्यायी मार्ग शोधला जात आहे. करनूर, मत्तीवडे मार्गे महामार्गाकडे जाण्याचा पर्याय निवडला जात असताना दोन मिनिटांच्या रस्त्यासाठी १० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.

फोटो: २५०२२०२१-कोल-कोगनोळी नाका०१

फोटो ओळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कोगनोळी फाट्यावर बॅरिकेट्‌स लावून आशियाई महामार्गच इतर राज्यातील वाहनधारकांसाठी अडवून धरला असल्याने नेहमी गजबजलेला हा मार्ग आता असा सुनासुना वाटत आहे.

फोटो: २५०२२०२१-कोल-कोगनोळी नाका ०२

फोटो ओळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कोगनोळी फाट्यावर तपासणी नाका सुरू करून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची अशाप्रकारे चौकशी केली जात असल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Web Title: Kognoli Naka is a headache for interstate passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.