शीतल चंद्रप्रकाशात कोजागिरी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:03 PM2020-10-31T12:03:20+5:302020-10-31T12:08:02+5:30
kojagiri, kolhapunrews, gardan, terese धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरेचे कोंदण लाभलेली कोजागिरी पौर्णिमा शुक्रवारी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरी केली. यंदा कोजागरीवर कोरोनाचे सावट असल्याने तसेच शहरातील सर्वच उद्याने बंद राहिल्यामुळे पौर्णिमेच्या शीतल चंद्रछायेत सहकुटुंब उद्यानात बसून गोड भोजनाचा आस्वाद घेणे शहरवासीयांना शक्य झाले नाही. मात्र, पर्याय म्हणून घराचे टेरेसवर बसून काहींनी आनंद घेतला.
कोल्हापूर : धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरेचे कोंदण लाभलेली कोजागिरी पौर्णिमा शुक्रवारी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने साजरी केली. यंदा कोजागरीवर कोरोनाचे सावट असल्याने तसेच शहरातील सर्वच उद्याने बंद राहिल्यामुळे पौर्णिमेच्या शीतल चंद्रछायेत सहकुटुंब उद्यानात बसून गोड भोजनाचा आस्वाद घेणे शहरवासीयांना शक्य झाले नाही. मात्र, पर्याय म्हणून घराचे टेरेसवर बसून काहींनी आनंद घेतला.
कोजागिरीला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री बारा वाजल्यानंतर अमृत पाझरत असल्याचा समज असून त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले जाते. तसेच या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीतलावावर येत असते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक घरांतून मध्यरात्रीनंतर लक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
घरासमोर दूध उकळून या दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असल्याचा सांगण्यात येते. म्हणून रात्री नऊ वाजल्यापासून ठिकठिकाणी दूध उकळून पिण्यावर अनेकांचा भर होता. गोड व गरम दुधाचा अनेकांनी आस्वाद घेतला. काही कॉलनीतून दूध वाटपही करण्यात आले. सहकुटुंब-सहपरिवार रात्री टेरेसवर बसून भोजनाचा आनंद घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शीतल चंद्रप्रकाश न्याहाळण्यात कुटुंबे रंगली होती.
ब्ल्यू मून दर्शनाचा आज योेग
कोल्हापूर : महिन्यातून एकदा होणारे पूर्णचंद्राचे दर्शन या महिन्यात दुसऱ्यांदा अनुभवाला मिळणार आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पूर्णचंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ असे म्हणतात. या योग आज, शनिवारी ३१ ऑक्टोबरला रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी अनुभवता येणार आहे.
या महिन्यातील पहिल्या पूर्णचंद्राचे दर्शन २ ऑक्टोबरला पहाटे २.३५ वाजता घडले होते. उगवणारा चंद्र लालसर असतो परंतु चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तित प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करड्या छटा मिसळल्याने ती नीळसर भासतो. मात्र, ‘ब्ल्यू मून’संदर्भात हा निकष नाही.
वर्षाला १२ पूर्णचंद्र दिसतात, परंतु यंदाच्या वर्षी १३ दिसतील. यापूर्वी ३० जून २००७ रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर असा योग ३० सप्टेंबर २०५० मध्ये येणार आहे. २०१८ मध्ये ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्ल्यू मून’ दिसले होते. आता पुढील ‘ब्ल्यू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ राेजी दिसेल.