हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? इंधन दरवाढीचा निषेध करत युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 03:20 PM2021-10-31T15:20:06+5:302021-10-31T15:20:37+5:30
कोल्हापूर शहरातून सायकल रॅलीने इंधन दरवाढीचा जाहीर निषेध
कोल्हापूर: सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तमाम भारत वासियांना "अच्चे दिन" दाखविण्याचे वचन दिले होते. पण, निवडणुकीनंतर "चुनावी जुमला" म्हणत तमाम भारतवासियांना महागाईच्या खाईत ढकलले. देशात इंधन दरवाढीने जतना होरपळून जात असताना, पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे चालू आहेत. हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन? असा सवाल करीत रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहर युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध केला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथून या रॅलीची सुरवात करण्यात आली. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “युवासेना जिंदाबाद”, "पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेबांचा विजय असो" “पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो”, “मोदी सरकार हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी, ' देशात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा उच्चांक झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, चाकरमानी, शेतकरी, बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार इंधनात दरवाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करत आहे. भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोल, डिझेलचे दर गेले असताना त्यात दर दिवशी आणखी वाढ करत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे.'
शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथून सुरु करण्यात आलेली सायकल रॅली सोन्या मारुती मंदिर चौक, राजर्षि शाहू महाराज समाधी स्थळ, सीपीआर चौक, दसरा चौक, अयोध्या टॉकीज चौक, बिंदू चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येवून सांगता करण्यात आली.