Kolhapur: सुनीलकुमार लवटे यांच्याकडून समाजकार्यासाठी १ कोटींचा निधी
By समीर देशपांडे | Published: June 23, 2024 07:43 PM2024-06-23T19:43:42+5:302024-06-23T19:44:10+5:30
Kolhapur News: ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि सामाजिक नेते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी समाजकार्यासाठी १ कोटी रूपयांच्या निधीची घोषणा रविवारी केली. गर्दीने खचाखच भरलेल्या राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या निधीबाबत माहिती देतानाच कुटुंबाचा हा विश्वस्त निधी असला तरी त्यावर समाजाचा हक्क असेल असे स्पष्ट केले.
- समीर देशपांडे
कोल्हापूर - ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि सामाजिक नेते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी समाजकार्यासाठी १ कोटी रूपयांच्या निधीची घोषणा रविवारी केली. गर्दीने खचाखच भरलेल्या राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या निधीबाबत माहिती देतानाच कुटुंबाचा हा विश्वस्त निधी असला तरी त्यावर समाजाचा हक्क असेल असे स्पष्ट केले.
डॉ. लवटे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षभरात विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यानिमित्ताने संध्याकाळी महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे मुख्य संवर्धक डॉ. विवेक सावंत यांच्या व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. टाळ्यांच्या कडकडाटातच उपस्थितांनी आधीपासूनच ज्ञात असलेल्या डॉ. लवटे यांच्या दातृत्वाच्या गुणाला दाद दिली.
डाॅ. लवटे म्हणाले, दहा वर्षाचा असताना कोल्हापुरात आलो. नोकरी केली. संसार केला. सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक संस्थांवर काम केले. परंतू एका क्षणी सर्व संस्थात्याग करून सध्या माझे लेखन, वाचन, चिंतन सुरू आहे. माणसानं टोकाची कृतीशीलता जपली पाहिजे असे माझे मत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून मी हा निधीचा निर्णय घेतला आहे. अंधार उजळण्यासाठी एक पणती जेवढं काम करते तेवढं जरी काम या निधीतून झालं तरी मला याचा आनंद आहे. नावेमध्ये जादा पाणी आणि घरामध्ये जादा पैसा झाला तर पाणी दाेन्ही हातानी बाहेर टाकावे आणि पैसा गरजूंना द्यावा असे कबीर म्हणत. त्याला अनुसरूनच मी हा निर्णय घेतला. यापुढच्या काळातील अजून जोमाने, नैतिकतेने समाजसेवा करण्याचं माझं काम सुरूच राहणार असल्याची मी खात्री देतो.