कोल्हापूर : जयसिंगपूर, हुपरी नगरपालिकेला १ कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:41 AM2019-01-01T11:41:02+5:302019-01-01T11:42:03+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हुपरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले.
कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हुपरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले.
जयसिंगपूर नगरपालिकेने १ कोटी ७१ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६0 लाख ४७ हजार रुपये असून, त्यातील ३0 लाख २३ हजार रुपये केंद्र शासनाने वितरित केले आहेत. तर राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचे २0 लाख १५ हजार रुपये अदा केले आहेत. असे एकूण ५0 लाख ३९ हजार रुपये जयसिंगपूरसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
हुपरी नगरपालिकेने १ कोटी ७८ लाख २५ हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६२ लाख ३८ हजार रुपये असून, त्यातील ३१ लाख १९ हजार रुपये केंद्र शासनाने वितरित केले आहेत. तर राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचे २0 लाख ७९ हजार रुपये अदा केले आहेत. असे एकूण ५२ लाख ९९ हजार रुपये जयसिंगपूरसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
राज्यातील ३२ नगरपालिकांनी १७४ कोटी रुपये ९२ लाख रुपयांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्र शासनाला सादर केले होते. त्यातील केंद्र शासनाचा निधी ६१ कोटी २३ लाख रुपये असून, पैकी ३0 कोटी ६१ लाखांचा पहिला हप्ता महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे.