कोल्हापूर : दहा रूपयाला बुट्टीभर लिंबू, गवार, भेंडी, दोडका ऐंशी रुपयांच्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:45 AM2018-06-25T11:45:08+5:302018-06-25T11:50:34+5:30
लिंबूची आवक कायम असली तरी पावसामुळे मागणी कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम दरावर झाला असून रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात लिंबूचे ढीगच दिसत होते. दहा रुपयाला बुट्टीभर लिंबू विक्रीस होते. भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर वधारले असून गवार, भेंडी व दोडका या प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो ऐंशी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गत आठवड्यात साखरेचे दर काहीसे सुधारले होते, पण पुन्हा घसरण सुरू झाले असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३४ रुपये दर आहे.
कोल्हापूर : लिंबूची आवक कायम असली तरी पावसामुळे मागणी कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम दरावर झाला असून रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात लिंबूचे ढीगच दिसत होते. दहा रुपयाला बुट्टीभर लिंबू विक्रीस होते.
भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर वधारले असून गवार, भेंडी व दोडका या प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो ऐंशी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गत आठवड्यात साखरेचे दर काहीसे सुधारले होते, पण पुन्हा घसरण सुरू झाले असून किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३४ रुपये दर आहे.
पावसाळा सुरू झाल्याने लिंबूची मागणी एकदम कमी झाली आहे. रविवारी लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात दहा रुपयाला प्लास्टिकची बुट्टी भरून लिंबू मिळत होते.
उन्हाळा संपला की लिंबूच्या मागणीत घट होऊन दरात घसरण सुरू होते. पण यंदा लिंबूची आवक अजूनही चांगली आहे, त्यात मागणी एकदमच कमी झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात तीनशे रुपयांना चुमडे आहे. किरकोळ बाजारात तर दर एकदम खाली आले आहेत. लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात पिवळे धमक रसरसीत लिंबू रुपयाला होते.
लहान-मोठे बुट्टीभर लिंबू दहा रुपयांना मिळत होते. पावसाने सुरुवात केल्याने बाजारात स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर चांगलेच तेजीत राहिले आहेत.
गवार, भेंडी, दोडका या प्रमुख भाज्यांचे दर ऐंशी रुपये किलोपर्यंत गेले आहेत. टोमॅटोचे दर ही थोडेसे वधारले असून वीस रुपये किलो राहिला आहे. कोबी, वांगी, ढब्बू, कारली, वरणा या भाज्यांचे दर काहीसे स्थिर आहेत. पालेभाज्यांमध्ये मेथी पंधरा रुपये पेंढी, पोकळा, पालक दहा रुपये पेंढी आहे.
फळ मार्केटमध्ये अननस, तोतापुरी आंब्याची रेलचेल आहे. लालबागच्या आंब्याची आवक अजून सुरू असून साधारणत: ४० रुपये किलो दर राहिला आहे. सफरचंद, डाळींब, पेरूची आवक कायम आहे. अननस वीस, तीस रुपये तर तोतापुरी आंबा दहा रुपयाला आहे.
तूरडाळ, हरभराडाळीसह इतर डाळींच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. सरकी तेल, शाबूचे दर स्थिर असून साखरेच्या दरात थोडी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात ३६ वरून ३४ रुपये किलोपर्यंत साखर खाली आहे.
शेतीकामामुळे मार्केट थंड
सध्या पावसाने सुरुवात केल्याने शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील मार्केटवर दिसत आहे. किराणा मालासह इतर दुकाने एकदम शांत झाली आहेत.
कांदा-बटाटा स्थिर
या आठवड्यात कांद्याची आवक तुलनेत कमी असली तरी दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. घाऊक बाजारात सरासरी १० रुपये तर बटाटा २० रुपये किलो आहे. लसणाच्या दरातील घसरण थांबत नाही, किरकोळ बाजारात ४० रुपये किलो दर आहे.