कोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी दोन्ही गटांच्या ११ जणांना आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 06:17 PM2018-04-23T18:17:41+5:302018-04-23T18:17:41+5:30
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटांच्या एकूण ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटांच्या एकूण ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.
पाटील यांच्या खूनप्रकरणी दिलीप अशोक जाधव ऊर्फ डी. जे. (वय ३९), अमोल अशोक जाधव (२९, दोघेही रा. रुमाले मळा, माळवाडी पाचगाव), हरीष बाबूराव पाटील (३८, तिटवे, ता. राधानगरी), ओंकार विद्याधर सूर्यवंशी (२३, रा. सिद्धनगर, निपाणी), महादेव ऊर्फ हेंमत म्हसगोंडा कलगुटकी (२६, रा. वड्डवाडी, राजारामपुरी, कोल्हापूर, मूळ सांगली), तसेच गाडगीळ याच्या खूनप्रकरणी मिलिंद अशोक पाटील (३०), महेश अशोक पाटील (२८), अक्षय जयसिंग कोंडेकर (३०) निशांत ऊर्फ मुन्ना नंदकुमार माने (२५), प्रमोद कृष्णात शिंदे (२८), गणेश कलगुटकी (२६, सर्व रा. पाचगाव, ता. करवीर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर सबळ पुराव्याअभावी गाडगीळ खूनप्रकरणातून सुनील बाजीराव घोरपडे (५२), रहिम सनदी (३४), माजी नगरसेवक अमोल माने (५२), अजित कोरे (५४, सर्व रा. पाचगाव) यांची निर्दोष मुक्तता केली. यामध्ये २३ साक्षीदार तपासले त्यापैकी चारजण फितूर झाले. निर्दोष झालेल्यांतील अजित कोरे यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये दोन कुटुंबांतील चार भावंडांचा समावेश आहे.
अशोक जाधव खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल यांनी, तर गाडगीळ खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील श्रीकांत जाधव व त्यांचे सहायक अॅड. विश्वजित घोरपडे यांनी काम पाहिले.
दि. १३ फेब्रुवारी २०१३ ला भर दुपारी न्यू महाद्वार रोडवरील अॅक्सिस बँकेच्या दारात अशोक पाटील हा सिगारेट ओढत मोबाईलवर बोलत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा तरुणांपैकी दोघांनी पाटील यांच्या डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता.
या खुनामुळे सुडाने पेटलेल्या पाटील गटाने खुनाचा बदला खून म्हणून आरोपी दिलीप जाधव याचा मेहुणा धनाजी गाडगीळ याचा दि. १३ डिसेंबर २०१३ ला पाचगाव येथे कोयता, खंजीर व तलवारीने सपासप वार करून खून केला होता. या पाचगाव ग्रामपंचायतीतील वर्चस्व वादातून झालेल्या या खून प्रकरणाच्या खटल्याकडे साऱ्या जिल्ह्याचे व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते.
राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक एस. व्ही. शेलार यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सत्र न्यायालयात सादर केले. या गुन्ह्यातील सर्व संशयित कळंबा मध्यवर्ती कारागृहात होते.