कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधी १५ दिवसांत वटहुकूम, पालकमंत्री पाटील यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:27 PM2017-12-16T14:27:35+5:302017-12-16T14:34:28+5:30
अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीच्या सदस्यांशी मोबाईलवरून बोलताना दिली. मुदतीत हा कायदा संमत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीच्या सदस्यांशी मोबाईलवरून बोलताना दिली. मुदतीत हा कायदा संमत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला.
अंबाबाई मूर्तीला ९ जूनला घागरा चोली नेसवल्याच्या प्रकरणानंतर कोल्हापूरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात पगारी पूजारी नियुक्तीसंबंधीचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. आता अधिवेशन संपत आले तरी कायदयाचा विषय चर्चेस आलेला नाही. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने बैठक घेवून आंदोलनाची दिशा निश्चित केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले,‘मंत्री चंद्रकांतदादांशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेवरून पुढील पाच दिवसात पगारी पुजारीविषयी चर्चा होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे या अधिवेशनात कायदा संमत होण्याची शक्यता कमी आहे.
२२ तारखेला अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी जावू दे. त्यानंतर पगारी पुजारी नियुक्तीचा वटहुकूम काढू व मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करू असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला आहे.
संघर्ष समिती मात्र मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार अधिवेशन काळातच कायदा संमत व्हावा यासाठी आग्रही आहे. या कालावधीत कायदा संमत न झाल्यास त्यासंबंधीचा वटहुकूम निघून त्याचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत आम्ही पून्हा आंदोलन करू.’
यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर आर. के. पोवार, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, बाबा पार्टे, चारुलता चव्हाण, प्रा. जयंत पाटील, शरद तांबट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फक्त अंबाबाई मंदिरासाठीच स्वतंत्र कायदा
पंढरपूरप्रमाणे केवळ अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासाठी संघर्ष समितीने आंदोलन केले आहे. मात्र शासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिराचा एकत्रित विचार करत आहे. असे झाल्यास हा कायदा पून्हा रखडणार आहे. त्यामुळे फक्त अंबाबाई मंदिरासाठीच स्वतंत्र कायदा करण्यात यावा असा आमचा आग्रह असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व दिलीप पाटील यांनी सांगितले.
कोल्हापुरात शनिवारी अंबाबाई मंदिरातील पगारी पूजारी नियुक्ती संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पूजारी हटाव संघर्ष समितीची बैठक झाली. त्यास शरद तांबट, विजय देवणे, संजय पवार, आर. के. पोवार, दिलीप पाटील, चारुलता चव्हाण, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)