कोल्हापुरात १९ तरूणांनी अनुभवला पुरात पोहण्याचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:01 PM2019-07-31T15:01:37+5:302019-07-31T15:03:17+5:30
कसबा बावडा/कोल्हापुर :येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या १९ कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचा थरार अनुभवला. ...
कसबा बावडा/कोल्हापुर :येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या १९ कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचा थरार अनुभवला. शिवाजी पुल ते राजाराम बंधारा हे चार किमीचे अंतर कापण्यासाठी त्यांना अवघ्या ३० मिनिटांचा अवधी लागला. गेली दहा वर्ष हे तरुण प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत आले आहेत.
सकाळी ६ वाजून ४५ मिनिटानी सर्व तरुणांनी शिवाजी महाराज की जय... म्हणत पुलावरून उड्या टाकल्या. नदीला प्रचंड पूर असल्याने व पाण्याच्या प्रवाहाला जोराची गती असल्याने पाण्यातच एकमेकाला सूचना देत सर्वांनी मुख्यप्रवाहातून पोहण्याचा निर्णय घेतला. पुरात एकदा उडी टाकल्यावर राजाराम बंधारा येथे पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागत असे.मात्र यंदा प्रचंड पुरामुळे पाण्याला आलेल्या प्रचंड गतीमुळे व मुख्य प्रवाहातून पोहल्यामुळे हे अंतर अवघ्या ३० मिनिटात कापले गेले.
या मोहिमेत मधुकर राजदीप, संग्राम जाधव, शिवाजी ठाणेकर, सूर्यकांत सुतार, तानाजी चव्हाण, प्रतीक सुतार, प्रज्वल केंबळे, अवधूत चव्हाण, जितू केंबळे, कौशिक कदम, प्रवीण केंबळे,विनायक आळवेकर,धीरज मोरे, संतोष गायकवाड, गणेश उलपे, रावसाहेब शिंदे, कविराज राजदीप, सुरज पिसाळ आदी सहभागी झाले होते. त्यांना संजय जासूद ,अनिल जाधव, राजू पवार ,राजू राणे, प्रशांत पाटील, विजय रावण व कैलास मोरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.