कोल्हापूर : शेतकरी संघ निवडणुकीसाठी २५ हजारांचे शेअर्स लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:52 PM2018-08-21T13:52:57+5:302018-08-21T14:05:18+5:30
शेतकरी सहकारी संघाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती व संस्था सभासदांना आता किमान २५ हजारांचे शेअर्स हवेत, तसा पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्याचबरोबर व्यक्ती सभासदांना वर्षाला किमान २५ हजारांची, तर संस्थांना एक लाख रुपये किमतीचा माल संघाकडून खरेदी करावा लागणार आहे.
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती व संस्था सभासदांना आता किमान २५ हजारांचे शेअर्स हवेत, तसा पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्याचबरोबर व्यक्ती सभासदांना वर्षाला किमान २५ हजारांची, तर संस्थांना एक लाख रुपये किमतीचा माल संघाकडून खरेदी करावा लागणार आहे. सत्तारूढ गटाच्या या निर्णयाने सामान्य सभासद निवडणुकीच्या प्रक्रियेपासून बाजूला फेकल्याने या पोटनियम दुरुस्तीला विरोध होऊ लागला आहे.
शेतकरी संघाची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ आॅगस्टला दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवन येथे होत आहे. संघाच्या सत्तारूढ गटाने निवडणुकीसाठी पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. पूर्वी संघाची शेअर्स रक्कम शंभर रुपये होती. मध्यंतरी त्यामध्ये वाढ करून ती पाचशे रुपये केली.
यापूर्वी संघाची निवडणूक लढविण्यासाठी व्यक्ती सभासदाने वर्षभरात एक हजाराचा, तर संस्था सभासदांनी पाच हजारांचा माल संघाच्या दुकानातून खरेदी करणे आवश्यक होते.
आता सत्तारूढ गटाने हा पोटनियम बदलण्याचा घाट घातला आहे. निवडणूक लढविणाऱ्या व्यक्ती सभासदाच्या नावावर किमान २५ हजारांचे (पाचशे रुपये दर्शनी किमतीचे ५० शेअर्स) शेअर्स व प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५ हजार ५पयांची खरेदी करणे बंधनकारक केले आहे.
त्याचबरोबर संस्था सभासदांनी २५ हजारांचे शेअर्स व प्रत्येक आर्थिक वर्षात एक लाख रुपये किमतीचा माल खरेदी करावा लागणार आहे. याबाबतचा पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव सत्तारूढ गटाने सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.
या निर्णयामुळे सामान्य सभासदाला निवडणुकीलाच उभे राहता येणार नाही. मुळात ज्या उद्देशाने स्वर्गीय तात्यासाहेब मोहिते यांच्यासह दिग्गज नेत्यांनी शेतकरी संघ वाढविला. त्या उद्देशाला सध्याचे विश्वस्त तिलांजली देत असल्याची टीका सभासदांमधून होत आहे.
सभासदांना १३ टक्के लाभांश
संघाला २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४२ लाख ४९ हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यातून सभासदांना १३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. गेल्या वर्षी १२ टक्के लाभांश दिला होता.