कोल्हापूर : पर्यावरण बालनाट्य महोत्सव ३० तारखेला, पारितोषिकात वाढ, शालेय संघांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:14 PM2018-01-18T13:14:43+5:302018-01-18T13:19:06+5:30
इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंगच्या विद्यमाने ३० तारखेला राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बालनाट्यांना प्रोत्साहन म्हणून यंदाच्यावर्षीपासून लेखन, दिग्दर्शन, सांघिक सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या रोख परितोषिकंमध्ये वाढ करण्यात आली आहे.
कोल्हापूर : इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंगच्या विद्यमाने ३० तारखेला राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बालनाट्यांना प्रोत्साहन म्हणून यंदाच्यावर्षीपासून लेखन, दिग्दर्शन, सांघिक सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या रोख परितोषिकंमध्ये वाढ करण्यात आली आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या या महोत्सवात ग्रामीण व शहरी विभागासाठी स्वतंत्र पारितोषिक देण्यात येणार आहेत. महोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष असून विद्यार्थीदशेतच मुला-मुलींमध्ये पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अंगभूत अभिनय कलेला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. त्यात ‘सर्वोत्कृष्ट सांघिक बालनाट्य’, ‘सर्वोत्कृष्ट लेखन’, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन’ या विभागात तीन क्रमांक व सर्वोत्कृष्ट अभिनय मुले, मुली विभागात दोन क्रमांक काढण्यात येणार आहेत.
स्पर्धेत संघांनी पर्यावरणाशी संबंधित विषयांवर दहा ते बारा मिनिटांत सादरीकरण करणे अपेक्षित आहे. स्पर्धेत केवळ शालेय संघांनाच प्रवेश देण्यात येणार असून त्यात माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज मनिष गाला,आभूषण, ५५६ डी, पानलाईन, पापाची तिकटी येथे सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत मिळतील. अधिक माहितीसाठी प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.