कोल्हापूर : पेयजल योजनेचा ३४८ कोटींचा आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:27 PM2018-07-27T12:27:23+5:302018-07-27T12:56:01+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील २४८ गावे आणि वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाणी योजनांना राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. या योजनांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून जिल्ह्याला ३४८ कोटींचा निधी मिळणार आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर प्रादेशिक योजनेला सर्वाधिक १४२ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील २४८ गावे आणि वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाणी योजनांना राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. या योजनांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून जिल्ह्याला ३४८ कोटींचा निधी मिळणार आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर प्रादेशिक योजनेला सर्वाधिक १४२ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक धरणे आणि पाणी योजना कार्यान्वित असल्या तरीही उन्हाळ्यात अनेक छोट्या वाड्यावस्त्यांवर मात्र पाणीटंचाई जाणवते. कागदोपत्री जरी टॅँकरमुक्ती झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीच्या सरकारच्या काळातील अनेक योजना रद्द करण्यात आल्या. ‘मुख्यमंत्री पेयजल योजना’ सुरू केली. मात्र त्यातील जाचक निकषांमुळे बहुतांश गावांतील योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अनेक गावांमधील तसेच वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत होता.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर खडाजंगी झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रलंबित योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्र्यांकडे या २४८ गावांचा आराखडा सादर करण्यात आला होता. गुरुवारी या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.
केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्चातील वाटा उचलणार आहे. या योजनांमधील २४ गावांमध्ये जीवन प्राधिकरणाकडून योजना करण्यात येणार असून, यासाठी १७१ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
तालुकानिहाय गावांना मिळणारा निधी
तालुका वाड्यावस्त्यांची संख्या निधी (कोटींत)
आजरा १५ 0८.१८
भुदरगड १४ ११.३५
चंदगड १२ 0५.४३
गडहिंग्लज 0९ १८.१७
गगनबावडा 0६ 0१.५
हातकणंगले २१ २७.६८
कागल २० ३९.४३
करवीर ३६ १५६.४६
पन्हाळा ४३ २५.९३
राधानगरी १६ 0८.९६
शाहूवाडी ३३ १४.९७
शिरोळ २३ ३०.३१
एकूण २४८ ३४८.४०