कोल्हापुरात उरले ४६ कोरोनाग्रस्त, दिवसभरात सात डिस्चार्ज : नवे दोनच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:13 PM2020-06-22T12:13:13+5:302020-06-22T12:14:13+5:30
गेल्या काही दिवसांत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापूर जिल्ह्यात दिसू लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होऊन झपाट्याने डिस्चार्ज घेऊन घरी परतत आहेत; त्यामुळे सध्या अवघे ४६ कोरोनाग्रस्त रुग्ण उरले असून, त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत; तर सुमारे ६८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापूर जिल्ह्यात दिसू लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होऊन झपाट्याने डिस्चार्ज घेऊन घरी परतत आहेत; त्यामुळे सध्या अवघे ४६ कोरोनाग्रस्त रुग्ण उरले असून, त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत; तर सुमारे ६८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज सकाळी १० वाजेपर्यत प्राप्त २ पॉझीटिव्ह अहवालामध्ये चंदगड तालुक्यातील-१ व गडहिंग्लज तालुक्यातील -१ असा समावेश आहे.
आज सकाळी १० वाजेपर्यंत ८७ अहवाल प्राप्त झाले असून प्राप्त अहवालापैकी ८५ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर ७३८ रूग्णांपैकी ६८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ४६ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात गत एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७३६ वर पोहोचली आहे. आता तपासणी केंद्रावरच सरसकट स्राव घेण्याची प्रक्रिया थांबल्याने चाचणी अहवालांच्या संख्येत घट झाली आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत ११६ नागरिकांचे स्राव घेऊन ते तपासणीसाठी पाठवले, तर गडहिंग्लज तालुक्यातच नवे दोन रुग्ण आढळले. दिवसभरात सुमारे १५५ चाचणी अहवाल प्राप्त झाले; त्यांपैकी १५१ निगेटिव्ह आले; तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत; शिवाय सातजण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत ६८३ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा- 76, भुदरगड- 73, चंदगड- 76, गडहिंग्लज- 89, गगनबावडा- 6, हातकणंगले- 11, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 68, शाहुवाडी- 180, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-26 असे एकूण 729 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-2, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 9 असे मिळून एकूण 738 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
वीस दिवसांत ६८४ जणांना डिस्चार्ज
कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने जून महिना दिलासादायक ठरला आहे. या महिन्याच्या २० दिवसांत नवीन १२९ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले असले तरी सुमारे ५४९ जणांनी कोरोनावर मात केल्याने उपचाराअंती ते बरे होऊन घरी परतले हे आशादायी चित्र आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही ७३६ वर पोहोचली असली तरीही त्यांपैकी सुमारे ६८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे; तर आठजणांचा बळी गेला आहे.