LokSabha2024: ‘कोल्हापुरा’त ४८, तर ‘हातकणंगलेत’ ३६ टक्क्यालाच गुलाल
By राजाराम लोंढे | Published: May 6, 2024 02:12 PM2024-05-06T14:12:14+5:302024-05-06T14:21:01+5:30
मागील पाच निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी..जाणून घ्या
राजाराम लोंढे
कोल्हापूर : लोकसभेच्या मागील पाच निवडणुकींतील लढती, झालेले मतदान आणि विजयी उमेदवाराच्या मताची टक्केवारी पाहिली तर सरळ लढतीत किमान ४८ टक्के, तर बहुरंगी लढतीत किमान ४३ टक्के मते घेतली तरच गुलाल लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘कोल्हापूर’ मतदारसंघातील विजयी उमेदवाराला ४८ टक्के मात्र हातकणंगलेत धैर्यशील माने, सत्यजित पाटील व राजू शेट्टी यांच्यात अटीतटीची लढत असल्याने येथे ३६ टक्के मते घेणाऱ्याला गुलाल लागणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने उमेदवारांच्या ‘थिंक टँक’ने जोडण्या लावल्या आहेत.
‘कोल्हापूर’ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक, तर आघाडीकडून शाहू छत्रपती यांच्यासह विविध पक्ष व अपक्ष असे २३ उमेदवार रिंगणात आहेत. हे जरी खरे असले तरी खरी लढत मंडलिक व शाहू छत्रपती यांच्यातच होत आहे. इतर उमेदवार किती मते घेतात यावर विजयाचा लंबक अवलंबून असला तरी अपक्षांचा फटका बसू नये, यासाठी दोन्ही उमेदवारांनी जोडण्या लावल्या आहेत.
मागील पाच निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी ६९.९० टक्के मतदान झाले आहे. मताची आकडेवारी आणि लढत पाहिली तर येथे विजयी होण्यासाठी किमान ४८ टक्के मते घेणे गरजेचे आहे. या मतदारसंघात १९ लाख २१ हजार ९३१ मतदान आहे, सरासरी ७० टक्के मतदान झाले तर विजयी उमेदवाराला किमान ६ लाख ४५ हजार ७६८ मतांची गरज भासणार आहे.
हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने, आघाडीकडून सत्यजित पाटील-सरूडकर, स्वाभिमानीकडून राजू शेट्टी, वंचित आघाडीकडून डी. सी. पाटील यांच्यासह तब्बल २७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे बहुरंगी लढत असल्याने छोट्या राजकीय पक्षांसह अपक्षांनी घेतलेले मतदान दिग्गजांची अडचण करू शकतात. या मतदारसंघात १८ लाख ०१ हजार २०३ मतदान आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्याचे आव्हान
लोकसभेच्या मागील पाच निवडणुकींत सरासरी ६९ टक्केच मतदान झाले आहे. यावेळी निवडणुकीत चुरस असली तरी वाढलेले तापमान व फोडाफाेडीच्या राजकारणामुळे मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसतो. त्यामुळे उमेदवारांना मतदानाचा टक्का वाढवण्याचे आव्हान आहे.
असे झाले तर मागील पाच निवडणुकींत मतदान
निवडणूक - कोल्हापूर मतदारसंघ - इचलकरंजी/ हातकणंगले मतदारसंघ
१९९९ ७२ टक्के ७२ टक्के
२००४ ६९.९२ टक्के ६५.१० टक्के
२००९ ६४.९२ टक्के ६७ टक्के
२०१४ ७१.७१ टक्के ७२.९९ टक्के
२०१९ ७०.९७ टक्के ७० टक्के
मागील पाच निवडणुकींत विजयी उमेदवारांची टक्केवारी
निवडणूक - मतदारसंघ - विजयी उमेदवार - कंसात टक्केवारी
१९९९ - कोल्हापूर - सदाशिवराव मंडलिक - (४६ टक्केे)
१९९९ - इचलकरंजी - निवेदिता माने - (४१ टक्के)
२००४ - कोल्हापूर - सदाशिवराव मंडलिक - (४९ टक्के)
२००४ - इचलकरंजी - निवेदिता माने - (५३ टक्के)
२००९ - कोल्हापूर - सदाशिवराव मंडलिक - (४१ टक्के)
२००९ - हातकणंगले - राजू शेट्टी - (४९ टक्के)
२०१४ - कोल्हापूर - धनंजय महाडिक - (४८ टक्के)
२०१४ - हातकणंगले - राजू शेट्टी - (५३ टक्के)
२०१९ - कोल्हापूर - संजय मंडलिक - (५६ टक्के)
२०१९ - हातकणंगले - धैर्यशील माने - (४६ टक्के)