कोल्हापूर : ७९ कुष्ठरोग बांधवांना जानेवारीत मानधन : अरुण वाडेकर, नऊ महिन्यांचे थकित मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:30 AM2017-12-19T11:30:04+5:302017-12-19T11:40:07+5:30
गेल्या नऊ महिन्यांपासून शेंडा पार्कातील कुष्ठधाममधील ७९ बांधवांचे रखडलेले मानधन हे फरकासह मिळणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील मंजुरीनंतर मासिक एक हजार रुपयांप्रमाणे कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यावर सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम जानेवारीमध्ये जमा होणार असल्याची माहिती प्रभारी आरोेग्य अधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी दिली.
कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यांपासून शेंडा पार्कातील कुष्ठधाममधील ७९ बांधवांचे रखडलेले मानधन हे फरकासह मिळणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील मंजुरीनंतर मासिक एक हजार रुपयांप्रमाणे कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यावर सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम जानेवारीमध्ये जमा होणार असल्याची माहिती प्रभारी आरोेग्य अधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी दिली.
सहा दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक भूपाल शेटे यांनी कुष्ठरोग बांधवांच्या मानधनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर दोन दिवसांत हे मानधन देऊ, असे आश्वासन प्रशासन दिले होते.
याबाबत प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, कुष्ठरोग बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून अपंग सहाय्यता कक्षामधून कुष्ठरोगांना हे मानधन दिले जाते. दर महिन्याला प्रत्येकी एक हजार रुपये हे मानधन दिले जाते. यासाठी कुष्ठधाममधील लिप्रसी आॅफिसर यांच्याकडून त्यांच्या नावांची यादी महापालिका मागवून घेते. या यादीनुसार हे मानधन त्यांना दिले जाते.
एक एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या कुष्ठरोगबांधवांना महिन्याचे मानधन दिले गेले नाही. त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. अपंगांचा राखीव असलेला शासनाचा तीन टक्के निधी हा कुष्ठरोगी बांधवांना अपंग सहाय्यता कक्षातून दिला जातो.
यासाठी प्रशासन कुष्ठरोग यांचा प्रत्येक वर्षी नवीन कृती आराखडा तयार करते. यंदा हा आराखडा आॅगस्टच्या दरम्यान तयार झाला. त्यामुळे कुष्ठरोग बांधवांच्या मानधनाला विलंब झाला. पुढील जानेवारीत सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत सदस्यांची मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतरच या ७९ कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यात ही रक्कम फरकासह रक्कम जमा होणार आहे.
कुष्ठरोगबांधवांना मानधन हे मिळणारच. कोणीही वंचित राहणार नाही.
- डॉ. अरुण वाडेकर,
प्रभारी आरोग्य अधिकारी,
कोल्हापूर महापालिका.