कोल्हापूर : ‘पर्यटन’मधून ‘राधानगरी-दाजीपूर’साठी ९४ लाखांचा निधी : प्रकाश आबिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:14 PM2018-04-04T12:14:39+5:302018-04-04T12:14:39+5:30
राज्य शासनाच्या सन २०१७-१८ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०१८ च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
कोल्हापूर : राज्य शासनाच्या सन २०१७-१८ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०१८ च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील निपाणी ते दाजीपूर रस्ता रा. मा. १७८, मांजरखिंड (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे जंक्शन सुधारणा व चौक सुशोभीकरण करण्याकरिता ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रिटर्न वॉल बांधणे, अर्थ वर्क अॅँड ग्रेड वन, एम. पी. एम. आणि कारपेट, पेव्हिंग ब्लॉक व निवारा शेड मंजूर करण्यात आले आहेत.
फेजीवडे येथील जंक्शन सुधारणा व चौक सुशोभीकरण करण्याकरिता ३६ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रिटर्न वॉल बांधणे, अर्थ वर्क अॅँड ग्रेड वन, कारपेट, पेव्हिंग ब्लॉक व निवारा शेड मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे अभयारण्याच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे.
राज्यमार्गावरील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता अभयारण्याची सुरुवात असणाऱ्या मांजरखिंड व छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेला राधानगरी धरणस्थळ चौक सुशोभीकरण होणार असून, यामुळे पर्यटकांना दाजीपूर अभयारण्यामधील पशुपक्षी व निसर्गसौंदर्याची थोडक्यात माहिती होणार आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.
विविध विकासकामांची उद्घाटने अभयारण्य परिसरात घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव फुलपाखरू उद्यान उभारणे (२८ लाख), राऊतवाडी धबधब्याचा परिसर सुशोभीकरण करणे (५० लाख), दाजीपूर येथे अत्याधुनिक तंबू निवासस्थान बांधणे (३० लाख), उगवाईदेवी व कोकण दर्शन पॉइंट विकसित करणे (४ लाख) यांसह अभयारण्य विकसित करण्याकरिता अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यामध्ये दाजीपूर येथे पर्यटकांसाठी अॅम्पिथिएटर उभारणे, दाजीपूर येथे पर्यटकांसाठी युवक गृह (डॉर्मेटरी) उभारणे, राधानगरी येथे युवक गृहा (डॉर्मेटरी)मध्ये सुधारणा करणे, राधानगरी येथे अत्याधुनिक व्ही. आय. पी. विश्रामगृह बांधणे, राधानगरी येथे पर्यटकांसाठी बांबू निवासस्थान उभारणे, दाजीपूर येथे होम स्टे संकल्पना राबविणे, आदी कामांचा समावेश असून, यामुळे राधानगरी-दाजीपूर अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी चालना मिळणार आहे.