कोल्हापुरात ‘आप’ची हलगी कडाडली

By admin | Published: February 11, 2015 12:10 AM2015-02-11T00:10:52+5:302015-02-11T00:15:55+5:30

विजयाचा जल्लोष : भाजप-काँग्रेसचा ‘झाडू’ने सफाया झाल्याच्या प्रतिक्रिया

Kolhapur 'Aap ki Chadali' | कोल्हापुरात ‘आप’ची हलगी कडाडली

कोल्हापुरात ‘आप’ची हलगी कडाडली

Next

कोल्हापूर : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर ‘भाजप-काँग्रेसचा ‘झाडू’ने पराभव,’ अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त झाली. कोल्हापुरातही चहा टपरीपासून सरकारी कार्यालयांपर्यंत आणि बसथांब्यापासून चौका-चौकांतही दुपारपर्यंत लोक दिल्लीत काय झाले, याची चौकशी करत होते. तरुण मंडळांच्या फलकांवरही ‘आप’च्या निकालाचे वृत्त झळकल्याचे दिसले.
कोल्हापुरात मंगळवारी दुपारी बिंदू चौकातून कार्यकर्त्यांनी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी लाडू वाटले. ढोल-ताशांचा गजर, केजरीवाल यांचे फलक व पक्षाचे चिन्ह असलेला ‘झाडू’ घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हा संयोजक नारायण पोवार, आनंद वणिरे, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, सचिन द्राक्षे, आदम शेख, संदीप देसाई, इलाही शेख, सुजाता पाटील, आदींचा सहभाग होता.

जनतेच्या जोरावर ‘आप’ने दिल्लीत एकहाती व निर्विवाद सत्ता मिळविली. भारतीय जनता पक्षाने पैशांच्या जोरावर सत्ता घेण्याचा प्रयत्न केला पण, तो मतदारांनी उधळून लावला. - नारायण पोवार, जिल्हा संयोजक, आप

गेल्या आठ महिन्यांत भाजपच्या परिघावर असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांची घरवापसी तसेच अन्य बाबींतील आततायीपणा या निवडणुकीत नडला आहे.
- डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक


‘आप’च्या माध्यमातून देशात दमदार विरोधी पक्षाचा उदय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील नाराजी या निकालातून स्पष्ट झाली. - डॉ. प्रकाश पवार, राजकीय अभ्यासक

भारतीय मतदारांनी चाणाक्षपणा दाखवून दिला. उन्मत्तपणे कोणी वागू नये, हा धडा दिल्लीच्या निकालातून दाखवून दिला आहे.
- गोविंद पानसरे, ज्येष्ठ कामगार नेते

दिल्लीत भाजपचा पराभव झाला असला तरी मतांची टक्केवारी कमी झालेली नाही. प्रत्येक राज्यातील स्थिती वेगवेगळी असते. पराभवाचे आत्मचिंतन भाजपचे वरिष्ठ नेते करतील.
- महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप, कोल्हापूर

Web Title: Kolhapur 'Aap ki Chadali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.