कोल्हापूर : रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांकडून सर्व्हे, दोन दिवस घेण्यात येणार माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:34 PM2018-05-21T13:34:23+5:302018-05-21T13:34:23+5:30
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतेबाबत एका खासगी कंपनीमार्फत प्रवाशांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. ही सर्व माहिती कंपनीच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवरून संबंधित रेल्वेस्थानकास ग्रेड देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतेबाबत एका खासगी कंपनीमार्फत प्रवाशांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. ही सर्व माहिती कंपनीच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवरून संबंधित रेल्वेस्थानकास ग्रेड देण्यात येणार आहे.
स्वच्छ भारतअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने शासकीय स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. त्या योग्य प्रकारे राबविल्या जातात की नाही, हे पाहण्याचे काम त्रयस्त कंपनीमार्फत केले जाते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ रेल’ या उपक्रमात दिल्ली येथील एका खासगी कंपनीतर्फे रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
यामध्ये सुमारे ३०० प्रवाशांकडून रेल्वेस्थानकातील स्वच्छतेबाबत आॅनलाईन पद्धतीने प्रश्नावली भरून घेतली जाते. यामध्ये स्थानकातील प्रवेशद्वारापासून, रेल्वेत बसण्याबाबतचे विविध २२ प्रश्न आहेत. यामध्ये येथील पाण्याची, स्वच्छतागृहाची, प्रतीक्षागृहाची, पार्किंगमधील स्वच्छता, आदी प्रश्नांचा समावेश आहे.
कंपनीचे केतन माळी व प्रमोद ढापणे यांच्यामार्फत कोल्हापुरात दोन दिवस हा सर्व्हे केला जाणार आहे. कंपनीच्या वतीने विविध रेल्वेस्थानकांवर १० मेपासून हा सर्व्हे सुरू केला आहे. ३० मेपर्यंत कंपनीमार्फत सुमारे ४०८ रेल्वेस्थानकांची पाहणी केली जाणार आहे. स्वच्छतेबाबतची माहिती रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित रेल्वेस्थानकास स्वच्छतेवरून ग्रेड देण्यात येणार आहे. यावेळी स्टेशन प्रबंधक विजयकुमार, रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, आदी उपस्थित होते.