कोल्हापूर : शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सुटका, पोलिसांची परवानगी न घेतल्याने कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:53 IST2018-02-15T18:50:08+5:302018-02-15T18:53:49+5:30
उसाची एफ. आर. पी. अधिक २०० रुपये असे एकरकमी पैसे व्याजासह द्यावेत, या मागणीसाठी लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या सहाहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.

कोल्हापुरातील साखर सहसंचालक यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनासाठी आलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोल्हापूर : उसाची एफ. आर. पी. अधिक २०० रुपये असे एकरकमी पैसे व्याजासह द्यावेत, या मागणीसाठी लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या सहाहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.
कोल्हापुरातील साखर सहसंचालक यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनासाठी आलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये ‘एफआरपी’ अधिक १०० व दोन महिन्यांनंतर १०० रुपये असा ऊसदराचा निर्णय झाला आहे. असा निर्णय झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ. आर. पी.ची मोडतोड करून २५०० रुपये पहिली उचल देण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी संघटनेला मान्य नाही.
त्या विरोधात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयासमोर आले. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना वाहनातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांची परवानगी न घेता आंदोलनाचा प्रयत्न केल्याने माणिक शिंदे यांच्यासह अजित पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील, बाळासाहेब मिरजे, संभाजी चौगुले, आदी कार्यकर्त्यांना मुंबई पोलीस कायदा कलम ६८ नुसार ताब्यात घेऊन व कलम ६९ नुसार ताकीद देऊन सोडून देण्यात आले.