कोल्हापूर : सात ठिकाणी मटक्यावर कारवाई; १० जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:16 PM2018-09-07T12:16:56+5:302018-09-07T12:19:57+5:30
कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी छापे टाकून १० जणांना अटक केली.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापे टाकून १० जणांना अटक केली.
या छाप्यांतून १७ हजार ८१५ रुपये जप्त केले. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्र्वाधिक तीन, तर लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दींत प्रत्येकी एक अशा एकूण सात ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी सांगितले की, शिवाजी उद्यमनगर परिसरात संशयित इकबाल रहिमान शेख (वय ३०, रा. बापूरामनगर, कळंबा) हा मटका घेत असताना अटक केली. संशयित राहुल पाटील (रा. यादवनगर, कोल्हापूर) हा मटका अड्ड्याचा मालक आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शेखकडून ४२०५ रुपये जप्त केले. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
याचबरोबर संशयित मोहन पप्पू सकट (रा. सदर बाजार, कोल्हापूर) व अभिजित यादव (रा. जवाहरनगर, कोल्हापूर) या दोघांना पकडून त्यांच्याकडून १५०५ रुपये जप्त केले. त्यांच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच संशयित विनायक धोंडीराम चौगले (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) व राजू यादव (रा. लक्ष्मीपुरी ) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांच्याकडून १७८५ रुपये जप्त केले. देवकर पाणंद येथील संशयित अण्णाप्पा गुंडाप्पा नाईक (रा. मनोरमानगर) यांच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ११५५ रुपये जप्त केले.
दरम्यान, करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटकाप्रकरणी संशयित रोहित धनंजय भंडवले (रा. नागोजीराव पाटणकर हायस्कूलजवळ) याच्याकडून ३६४० रुपये; तर वडणगे (ता. करवीर) येथील आनंदा हरी तांबेकर यांच्याकडून ३९४० रुपये आणि मोहन दत्तू घूमकर (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), मनोज शिवकुमार पिसे (रा. फुलेवाडी) या दोघांकडून १५८५ रुपये जप्त केले. या सर्वांवर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.