कोल्हापूर : जादा भाडे आकारणी करणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर्सवर ‘आरटीओ’ ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:43 PM2018-11-09T12:43:04+5:302018-11-09T12:48:24+5:30
दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेत खासगी कंत्राटी बसचालक कमाल भाड्यापेक्षा जादा भाडे आकारतात. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशा ट्रॅव्हलर्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला.
कोल्हापूर : दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेत खासगी कंत्राटी बसचालक कमाल भाड्यापेक्षा जादा भाडे आकारतात. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशा ट्रॅव्हलर्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला.
राज्यातील खासगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर राज्य शासनाने २७ एप्रिल २०१८ च्या निर्णयानुसार ठरवून दिले आहेत. तरीही काही ट्रॅव्हलर्स त्या दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणी करीत आहेत. सदर कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच प्रकारच्या बसेसच्या टप्पा वाहतुकीच्या सद्य:स्थितीच्या प्रति कि. मी. भाडेदरापेक्षा ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही, असे निश्चित केले आहे. तरीसुद्धा गर्दीचा फायदा घेत अनेक खासगी ट्रॅव्हलर्स अवाजवी भाडे आकारत आहेत.
याबद्दल राज्याच्या परिवहन आयुक्तांनी कारवाई करण्याबद्दलचे आदेश मंगळवारी (दि. ६) सायंकाळी काढले. त्यानुसार बुधवारी दुपारपासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा ट्रॅव्हलर्सविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार कारवाईस सुरुवात करीत नियमानुसारच भाडे स्वीकारण्यास अनेक ट्रॅव्हलर्सना भाग पाडले.
या कारवाईत स्वत: प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अलावारीस, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे, मोटारवाहन निरीक्षक असिफ मुल्लाणी, सुभाष देसाई, आदींनी सहभाग घेतला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.