कोल्हापूरात प्रशासन दक्ष;‘बीएलओ’ सुस्त, मतदार यादीतील कामांकडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:14 PM2018-10-06T16:14:52+5:302018-10-06T16:21:24+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
यामध्ये नावनोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे आदी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)च्या माध्यमातून करायची आहेत. परंतु हे ‘बीएलओ’ नेमके असतात कसे व ते कधी घरी येऊन जातात हा सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न आहे. याबाबत राजकीय कार्यकर्त्यांनीही आक्षेप घेतले आहेत. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासन दक्ष असले तरी ‘बीएलओ’ मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे.
प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेली आहे. ती नागरिकांसाठी मतदान केंद्रावर, तहसीलदार कार्यालय, तसेच कोल्हापूर महानगरपालिका येथे तपासून आपल्या नावाची खात्री करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मतदार यादीत नाव नसेल तर तो भरुन नमुना क्र. ६ चा फॉर्म आवश्यक पुराव्यासह भरून द्यावा. यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर ४ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने युध्दपातळीवर काम सुरु केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत.
एका बाजूला हे चित्र असले तरी तळागाळात मतदार यादीसंदर्भात जे प्रत्यक्ष काम करतात ते ‘बीएलओ’ मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता ‘बीएलओ’ हे बहुतांश ठिकाणी मतदारांच्या घरात गेलेले नाही. परिणामी काही दिवसांपूर्वी दौऱ्यावर आलेल्या विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासमोर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ‘बीएलओ’ घरोघरी जात नाहीत. तसेच गेले असतील तर ते वरवर फेरी मारत असल्याचे दिसत आहे.
कारण मतदार यादीत तब्बल ३ लाख ६५ हजार २१२ रंगीत छायाचित्रे समाविष्ट करण्याचे काम प्रलंबित आहे. ३१ आॅक्टोंबरपर्यंतच हे काम करायचे असून इतक्या अल्प कालावधिमध्ये हे काम पूर्ण होणार का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
‘बीएलओं’बाबत जिल्हा प्रशासन गंभीर
‘बीएलओं’च्या चालढकल कारभाराबाबत जिल्हा निवडणूक विभाग गंभीर आहे. त्यांनी याबाबत वेळोवेळी निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनीही ‘बीएलओं’च्या कामातील कुचराईबद्दल काही ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केल्याची आठवण कोल्हापूरात करुन दिली आहे. तरीही ‘बीएलओ’ मतदारांपर्यंत पाहोचण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे.
३ लाख ६५ हजार २१२ रंगीत छायाचित्रांचे काम प्रलंबित
प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या २९ लाख ६३ हजार३१४ इतकी आहे. छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या २९ लाख ६४ हजार ८२४, छायाचित्र नसलेल्यांची संख्या ४९०, कृष्ण धवल छायाचित्र असलेले मतदार ५ लाख २२ हजार ९१५, रंगीत छायाचित्र असलेले मतदार १ लाख ५७ हजार ७०३ तर रंगीत छायाचित्र नसलेले मतदार ३ लाख ६५ हजार २१२ आहेत.