कोल्हापूर प्रशासनाची ‘निवडणूक’घाई ! उद्यापासून आचारसंहितेची शक्यता -लोकसभेचे पडघम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:46 AM2019-03-08T00:46:25+5:302019-03-08T00:47:33+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या, शनिवारी लागणार असल्याची कुणकुण लागल्याने गुरुवारी दिवसभर जिल्हा प्रशासनात एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीस सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या, शनिवारी लागणार असल्याची कुणकुण लागल्याने गुरुवारी दिवसभर जिल्हा प्रशासनात एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीस सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समितीत अखर्चित निधी अन्य विभागांकडे वळविण्यासाठी लगबग वाढली.
महत्त्वाच्या फाईल आचारसंहितेत अडकू नयेत म्हणून स्वत: जातीनिशी उपस्थित राहून काम करवून घेणाऱ्यांची वर्दळ दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात दिसत होती. व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा निधी संबंधित लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यासाठी धावपळ सुरू होती.जिल्हा नियोजन विभागास मंत्रालयातून आचारसंहितेबाबत पूर्वकल्पना मिळाल्याने निधी खर्ची टाकण्याबाबत प्रक्रिया सुरू होती. समितीला या वर्षी २६३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १९२ कोटी रुपये यापूर्वीच आले आहेत; तर ७१ कोटींचा निधी फेब्रुवारीअखेरच्या कालावधीत प्राप्त झाला आहे. यापूर्वी आलेल्या निधीपैकी महसुली खर्च ७१ टक्के झाला आहे, तर भांडवली खर्च अजून ४८ टक्क्यांवरच आहे.
निधीमधील ७१ कोटी रुपये उशिरा प्राप्त झाल्याने टेंडर प्रक्रियेतच बराचसा वेळ गेला आहे. त्यामुळे हा निधी अखर्चित राहून परत जाऊ नये यासाठी नियोजन समिती दक्षता घेत आहे. अखर्चित निधी मागणीच्या प्राधान्यानुसार अन्य विभागांकडे वळविण्यावर भर दिला आहे.बुधवारी (दि. ६) दिवसभर संपूर्ण विभागात कर्मचारी बिले मंजुरीच्या कामातच व्यस्त दिसत होते. प्रत्यक्ष आचारसंहिता जाहीर होईपर्यंत ही कामे करीतच राहण्याच्या सूचना जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणा राबत आहे. रात्री उशिरापर्यंत कामे सुरूच होती. एकूणच शासकीय कार्यालयात आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घाई दिसून आली.
‘निवडणूक’ सुरळीत पार पाडा : देसाई
कोल्हापूर : प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येकाने प्रशिक्षण आत्मसात करून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार काम करावे. निवडणूक कामकाज विविध चार टप्प्यांत विभागले जाते. निवडणूकविषयक काम करताना अधिकारी व कर्मचाºयांनी घाबरून न जाता आनंदाने हे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.
राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय समित्यांसाठी पहिले प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, आदी प्रमुख उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा स्तरांवर नेमलेल्या विविध समित्यांनी करावयाच्या कामकाजाची आणि त्याअनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे, सहायक निवडणूक खर्च निरीक्षक बाबा जाधव यांनी दिली. हातकणंगलेच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आभार मानले.
दररोज दोन तास संकेतस्थळाचे वाचन करा
सर्व समित्यांची माहिती व त्याचे कामकाज हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिले आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी दिवसातून किमान दोन तास निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून समितीच्या कामकाजाबाबत वाचन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले.