Gunaratna Sadavarte: अॅड. गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात स्वत:च मांडली बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 04:17 PM2022-04-21T16:17:39+5:302022-04-21T17:03:39+5:30
कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या ...
कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूरपोलिसांनी अटक केलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते याला आज, गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायालयाने सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात सुमारे तासभर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद मांडल्यानंतरनंतर मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी दुपारच्या सत्रात हा निर्णय दिला. त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणल्यानंतर प्रचंड गर्दी उसळली होती. सरकारपक्षातर्फ सहायक सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी तर फिर्यादीचे वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मराठा व मागासवर्गीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याने सकल मराठा मोर्चाचे समान्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
न्यायालयात पोलीस प्रशासनातर्फे शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी तक्रारीची माहिती दिली. त्यानंतर सहायक सरकारी वकील आम्रपाली कस्तूरे व ॲड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावेळी ॲड. पीटर बारदेस्कर व स्वत: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बाजू मांडताना, माझ्या वक्तव्याचे व्हीडीओ सोशल मीडीयावर आहेत त्याची चौकशी करावी, माझ्या आवाजाचे नमूणे सातारा येथे घेतले आहेत, त्याशिवाय आवश्यक असतील तर न्यायालयीन कोठडीत घेता येतील, तसेच मे २०२१ मध्ये माझ्याकडून झालेल्या वक्तव्यावर दंगे झाले नाहीत, तर आताच इतक्या उशीरा गुन्हे का दाखल केले. त्यामुळे मला पोलीस कोठडी देण्याची आवश्यता नाही, अशी बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने त्याला दुपारच्या सत्रात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
न्यायालयात गर्दी
बुधवारी त्याला ऑर्थर रोड कारागृहातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुरुवारी पहाटे कोल्हापूरात आणले. रात्रभर राजारामपूरी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले. सकाळी साडेअकरा वाजता त्याला पोलीस बंदोबस्तात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयात सुनावणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.