कोल्हापूर : अवैध बांधकामप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:40 AM2018-08-04T11:40:50+5:302018-08-04T11:43:06+5:30
गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल ते निगडेवाडीपर्यंतच्या अवैध बांधकामप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर आता पुढील सुनावणी ४ सप्टेबर रोजी होणार आहे.
कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील तावडे हॉटेल ते निगडेवाडीपर्यंतच्या अवैध बांधकामप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर आता पुढील सुनावणी ४ सप्टेबर रोजी होणार आहे.
गांधीनगर रस्त्यावरील महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अवैध बांधकामप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. अवैध बांधकामांना अभय द्यावे, महापालिकेच्या कारवाईला प्रतिबंध करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे. त्याचवेळी महापालिकेच्या वकिलांनी महापालिकेच्या वादग्रस्त जागेवर अवैध बांधकामे सुरूच असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी न्यायालयाने या बांधकामासंबंधीचे पंचनामे करून सध्याची स्थिती काय आहे, याबाबत छायाचित्रे तसेच प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.
यावेळी न्यायालयात महापालिकेचे वकील ज्येष्ठ विधितज्ज्ञ मारलापल्ले, विनय नवरे, नगररचनाचे सहायक संचालक धनंजय खोत उपस्थित होते. प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी त्यावर अभ्यास करण्याकरिता वेळ मागून घेतली; त्यामुळे याचिकेवर आता ४ सप्टेबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.