कोल्हापूर :स्वातंत्र्यानंतरसुद्धा भटक्या जमातींचा संघर्ष सुरूच : इदाते, विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:46 PM2018-01-23T17:46:33+5:302018-01-23T17:53:57+5:30
स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले.
कोल्हापूर : स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले.
विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्धभटक्या, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या सामाजिक, आर्थिक समस्या’ यावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
इदाते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करणाºया या समाजाला आज गुन्हेगार, भिकारी तसेच बेघर बनविले गेले आहे, ही सर्वांत मोठी समस्या आहे. माणसाला माणसाचा दर्जा दिला पाहिजे. यासाठी भटक्या-विमुक्तांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मानवी हक्क ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
गायकवाड म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या माणसाचा चेहरा नेहमी काळा असतो. त्याच्या मनगटात जगण्याची ताकद असते. समाजाने जाती व धर्मव्यवस्था यांची तटबंदी करून भटक्या विमुक्तांना समाजबाह्य केले आहे, शिक्षणाच्या प्रगतीने त्यांच्यातील अज्ञान, अंधकार दूर होतील. समाज परिवर्तनासाठी साहित्य आणि चळवळ यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळेच या भटक्या जमाती निश्चितच आपल्यात परिवर्तनाची क्रांती करतील व समाज विकास साधतील.
समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. पी.जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विकास मस्के यांनी करून दिला; तर प्रा. सुशील कोरटे यांनी आभार मानले.
समीर मुजावर व अमृता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, निबंधवाचक प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, राम राठोड, डॉ. नारायण भोसले, डॉ. संजय कोळेकर, डॉ. धनराज पाटील, महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक उपस्थित होते.