कोल्हापूर : महानगरपालिकेपाठोपाठ आता नगरपालिका होणार करोसीनमुक्त, नववर्षात पुरवठा विभागाकडून अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 05:24 PM2017-12-30T17:24:08+5:302017-12-30T17:29:34+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीनमुक्त करण्यासासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या नववर्षात हे अभियान सुरू करून ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केरोसीनमुक्त झालेल्या लाभार्थ्याला उज्वला अभियानांतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीनमुक्त करण्यासासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या नववर्षात हे अभियान सुरू करून ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केरोसीनमुक्त झालेल्या लाभार्थ्याला उज्वला अभियानांतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.
महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात केरोसीनमुक्तीसाठी पुरवठा विभागाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे केरोसीनमुक्तीचे जवळपास शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. इचलकरंजी नगरपालिकेतही हे काम ९० टक्क्यांंपर्यंत पोहोचले आहे.
येथे केरोसीनचा एक टॅँकर अजून सुरू असून, दोन महिन्यांत तो ही बंद होऊन शंभर टक्केशहर केरोसीनमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील उर्वरित जयसिंगपूर, कुरुंदवाड, वडगाव, हुपरी, गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड या नऊ नगरपालिकांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. नववर्षात याची सुरुवात होणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी, गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक यांच्या संयुक्त विद्यमाने व समन्वयाने हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये केरोसीन बंद करताना संबंधित लाभार्थ्याला प्रथम केंद्र सरकारच्या ‘उज्वला’गॅस योजनेंतर्गत गॅसचे कनेक्शन दिले जाणार आहे. अशा लोकांची माहिती संकलित करण्याचे काम गॅस कंपन्यांकडून सुरू आहे.
नगरपालिका क्षेत्रात बहुतांश लोकांकडे गॅस कनेक्शन असून, अद्याप काही लोकांकडे कनेक्शन नसल्याने त्यांची मदार ही केरोसीनवर आहे. त्यामुळे अशा लोकांचे केरोसीन बंद करताना त्यांची पर्यायी व्यवस्था करून देणे महत्त्वाचे आहे. यासाठी केरोसीनमुक्तीबरोबरच संबंधितांना गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला बैठक होणार असून, यामध्ये पुरवठा विभागाचे अधिकारी, गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका केरोसीनमुक्त झाली आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील नगरपालिका केरोसीनमुक्त करण्याचे अभियान या नववर्षात राबविले जाणार आहे. हे अभियान येत्या चार ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
- विवेक आगवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी