गणेशमूर्तींत पेणनंतर कोल्हापूरच
By Admin | Published: June 30, 2016 12:34 AM2016-06-30T00:34:07+5:302016-06-30T01:09:40+5:30
पंधराशे कारागीर : मूर्ती बनवण्यासाठी जागा अपुरी; तरुणांचा पुढाकार वाढला
शेखर धोंगडे -- कोल्हापूर --गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशमूर्तींच्या निर्मितीतून कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. गणेशमूर्ती निर्मितीत पेणनंतर कोल्हापूरचा दुसरा क्रमांक लागतो. येथील न रंगवलेल्या, कच्च्या गणेशमूर्ती कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील असंख्य गावांमध्ये जातात. तेथे या मूर्ती रंगवून विक्री केल्या जातात. गेल्या आठ दिवसांपासून या मूर्ती नेत आहेत.शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेश परिसरात ‘कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक’ सोसायटीच्या २२० व महापालिकेच्या ८५ प्लॉटमध्ये सुमारे २५० कुटुंबिय व त्यांच्याकडे काम करणारे सर्वसाधारण १५०० पेक्षा अधिक कारागिरांचे हात सर्वांगसुंदर सुबक गणेशमूर्ती बनविण्यात मग्न आहेत. यात अनुभवींबरोबरच तरुणाई या कलेला आधुनिकतेची किनार देत मूर्तींची आकर्षकता आणखी वाढवीत आहेत.
सुमारे चार लाख पोती प्लास्टर आॅफ पॅरिस, लाखो लिटर रंग अन् मातीचा उपयोग करून येथे गणेशमूर्ती साकारू लागले आहेत. वर्षानुवर्षे गणेशमूर्ती बनविणाऱ्या कुंभार कारागिरांसाठी शासनाकडून अनुदान व मातीची उपलब्धता झाल्यास या व्यवसायात नवे कारागीर येतील.
मातीची कमतरता : चांगल्या दराची शक्यता नाही
अनंत अडचणी : वर्षानुवर्षे मिळणारी व गणेशमूर्तीसाठी अत्यंत आवश्यक असणारी शाडूची माती ही पूर्वी जोतिबा, पन्हाळा, राधानगरी, शेणगाव येथे मिळत असे, परंतु जोतिबा पर्यटनस्थळ, पन्हाळ््यातील जमिन फॉरेस्टअंतर्गत गेल्याने,राधानगरीमध्ये बंदी तसेच शेणगाव येथे खासगी जागा व प्रमाण अत्यल्प असल्याने माती मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, बॉम्बे शाडू किंवा कर्नाटक येथील कोन्नूर, कोकणातील लांजा, शेणगाव, गारगोटी येथे उपलब्ध झाल्यास मिळेल त्या चढत्या दराने माती खरेदी घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे येथे सांगतात.
गुजरात, राजकोट, भावनगर येथून दरवर्षी ३००- ३५० ट्रक बॉम्बे शाडू आणून त्यापासून कच्च्या मूर्ती बनविल्या जातात. या मूर्ती कोकणासह इतर ठिकाणी पाठविल्या जातात. येथे दरवर्षी एक कुटुंबीय व कारागीर हे सरासरी दोन हजार मूर्ती घडवितात. यात नऊ इंचांपासून ११ फुटांपर्यंतचा समावेश असतो.
कोल्हापूरच्या गणेशमूर्तींना चेन्नई, बंगलोर, मंगलोर, हैदराबाद, हुबळी, बेळगावसह पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सातारा येथे सात वर्षांपासून मोठी मागणी असून, अनेक वर्षांपासून कोकणातही अधिक पसंती दिली जात आहे. सध्या बापट कॅम्प (मार्केटयार्ड) येथे गणेशमूर्तींचे मॉडेल. अनेक मूर्ती तयार झाल्या असून, त्यांची वाहतूकही सुरू झाली आहे. येथे जागेचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून, अनेकदा मार्केट यार्ड येथे मूर्ती ठेवण्यासाठी जागा भाड्याने घ्यावी लागते.
कलामंदिरचे कलाकार
कलामंदिर महाविद्यालयातील कलाकार गणेशमूर्तींना आकार देत स्वतंत्र व्यावसायिक बनले आहेत.
पुणे, मुंबई येथून रंगांची, तर गबाळाची आवक चेन्नई, बंगलोर, आंध्र प्रदेशातून होते.
मातीपासून बनविलेल्या मूर्तींना अधिक दर मिळतो. यात सर्वांचा फायदा व प्रगती आहे. मात्र, मातीची गरज मागणीनुसार पूर्ण होत नाही.
बाजारात चलती,
अनेकांना काम
आॅक्टोबरमध्ये सुरू होणारी लगबग यंदाच्या वर्षी पावसाच्या उशिरा येण्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाल्याने वाहतूक, कारागीर, रंग व अन्य शेकडो जोड व्यावसायिक तसेच कारागिरांच्या हाताला वेग आला आहे. यामध्ये शासनाकडून किंवा खासगी स्तरावर मागेल तितकी व योग्य दरात माती मिळाल्यास हा व्यवसाय बारमाही सुरू राहून अनेकांना जोडधंदे मिळतील.
आवश्यक तितकी माती व पाणी मिळाल्यास हा व्यवसाय बारमाही चालेल. अनेकांनी यातून आपली प्रगती केली असून, नवनवीन तरुण यामध्ये येत आहेत. कोल्हापूर ते कर्नाटक, कोकण, पुुणे, मुंबई येथील अनेकांना गणेशमूर्तीपासून व्यवसाय मिळाला आहे.
- कमलाकर कारेकर, सचिव,
कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी.