कोल्हापूर : भोंदू ज्योतिषाचा पुन्हा ताबा, कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:19 PM2018-12-17T14:19:27+5:302018-12-17T14:20:18+5:30
कुंडली पाहण्यास आलेल्या महाविद्यालयीन युवतीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले.
कोल्हापूर : कुंडली पाहण्यास आलेल्या महाविद्यालयीन युवतीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले.
संशयित मनोज ऊर्फ बाबा मधुकर नरके (वय ५०, रा. छत्रपती कॉलनी, सागरमाळ-शास्त्रीनगर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली.
त्याने खडीसाखर कोठून खरेदी केली. गुंगीचे औषध कोठून मिळविले, आणखी किती युवती-महिलांवर अत्याचार केला आहे, यासंबंधीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रविवारी दिली.
कुंडली पाहण्यास गेल्यानंतर युवतीवर संशयित नरके याने अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी नरके राहत असलेल्या शास्त्रीनगर येथील घरी छापा टाकून ज्या खोलीत अत्याचार झाला, तेथील पंचनामा केला.
नरकेची ओळख पीडित युवतीच्या मैत्रिणीने करून दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मैत्रिणीला पोलीस ठाण्यात बोलावून नरकेची ओळख परेड करून घेतली होती. नरकेला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केल्याने पोलिसांचा तपास अर्धवट राहिला होता.
पोलीस निरीक्षक पाटील यांनी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर करून संशयित नरके याने गुंगीचे औषध आणि खडीसाखर कोठून आणली याबाबत तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.