कोल्हापूरला पुन्हा हुडहुडी, तापमानात १५.९ अंश सेल्सिअसपर्यंत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:16 AM2018-12-29T11:16:02+5:302018-12-29T11:17:41+5:30
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर थंडीचे कोल्हापुरात पुनरागमन केले असून, थंडीच्या लाटेसदृश वातावरणाने जिल्हा गारठून गेला आहे. झोंबणारे वारे आणि कापरे भरविणाऱ्या थंडीने हुडहुडी भरली आहे.
कोल्हापूर : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर थंडीचे कोल्हापुरात पुनरागमन केले असून, थंडीच्या लाटेसदृश वातावरणाने जिल्हा गारठून गेला आहे. झोंबणारे वारे आणि कापरे भरविणाऱ्या थंडीने हुडहुडी भरली आहे.
तापमानाचा पारा १५.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. या हंगामातील हे नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने कोल्हापूरकर अधिकच गारठले आहेत.
आठवडाभरापूर्वी कोल्हापूरकरांनी कडाक्याची थंडी अनुभवली. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवू लागला होता. मागील चार दिवसांत जोरदार वारे वाहत होते. उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने मध्य महाराष्ट्रात समावेश होणाऱ्या कोल्हापुरातही गुरुवारी रात्रीपासून अचानक थंडी वाढली आहे.
शुक्रवारी दिवसभर गारठा होता. सायंकाळी पाचनंतर गारठा वाढत गेला. पुढील आठवडाभर हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आकाश निरभ्र राहणार असल्याने थंडीला पोषक वातावरण तयार झाले आहे.