कोल्हापूर : प्रशासनाविरोधात ‘सुकाणू समिती’चा शंखध्वनी, मागण्यांसाठी ‘जेल भरो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:03 PM2018-05-15T13:03:13+5:302018-05-15T13:03:13+5:30
सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात शंखध्वनी केला.
कोल्हापूर : सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात शंखध्वनी केला.
सरकार-दरबारी मागण्या करून थकल्याने बारा महिने आमच्यासोबत प्रामाणिकपणे असलेला मुका बैलच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेल, असा आग्रह धरत ‘बैल-एक्का’ आत नेण्यावरून आंदोलनकर्ते व पोलिसांत चांगलीच खडाजंगी उडाली.
महावीर गार्डन येथून महाराष्ट्र राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या मोर्चास सुरुवात झाली. ‘बैल-एक्क्या’तून सविनय कायदेभंग फॉर्म ठेवून माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली.
बैल-एक्का कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यावरून पोलीस व आंदोलनकर्त्यांत खडाजंगी उडाली. (छाया- दीपक जाधव)
सरकार बहिरे झाल्याने आम्ही आता त्यांच्याशी बोलणार नाही, माणसाची भाषा कळत नसल्याने मालकाशी इमानीइतबारे राहणारा मुका बैलच आमची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडेल. त्यामुळे तरी प्रशासनाचे डोळे उघडतात काय पाहू, असे सांगून संपतराव पवार यांनी ‘बैल-एक्का’ जिल्हाधिकारी कार्यालयात घालण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पवार व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यामध्ये खडाजंगी उडाली.
सरकारसह पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलनकर्त्यांनी शंखध्वनी करून निषेध नोंदविला. (छाया- दीपक जाधव)
त्यानंतर झालेल्या सभेत संपतराव पवार यांनी सरकारसह जिल्हा प्रशासनावर सडकून टीका केली. राज्य व केंद्रातील सरकार हे लबाडांचे असून, ते कष्टकरी जनतेला ताकदीच्या बळावर दाबून टाकत आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी केवळ रस्त्यांवर उतरून चालणार नाही.
गावागावांत सरकारविरोधात बंड उभे केल्याशिवाय आपण जगू शकणार नाही. इंग्रजांच्या काळात लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला कधी विरोध झाला नाही. सध्याच्या काळ्या ब्रिटिशांना बैलाचे एवढे वावडे का? अशी विचारणा पवार यांनी केली.
किसान सभेचे प्रा. नामदेव गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, बाबासाहेब देवकर, केरबा भाऊ पाटील, अंबाजी पाटील, एकनाथ पाटील, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, वसंतराव पाटील, प्रमोद पाटील, संग्राम पाटील-म्हाळुंगेकर, दिलीप देसाई, आदी उपस्थित होते.
सरकारचे नाक मोडते का?
आम्ही लोकशाही मार्गाने, तेही शांततेत शेतकऱ्यांच्या भावना बैल-एक्क्याच्या माध्यमातून मांडत असताना पोलिसांनी दडपशाही चालविली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याने आम्हाला रोखले गेले. बैल-एक्का आत गेल्याने सरकारचे नाक मोडते का? अशी टीका पवार यांनी केली.
पोलीस कर्मचाऱ्याने फॉर्म स्वीकारले
सुकाणू समितीने निवेदनाऐवजी बैल-एक्क्यातून सविनय कायदेभंगाचे फॉर्म आणले होते. ते बैल-एक्क्यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ओतण्याचा आंदोलनकर्त्यांचा आग्रह होता. पोलिसांनी मज्जाव केल्याने प्रवेशद्वारातच पोलीस कर्मचाऱ्याने ते फॉर्म स्वीकारले.