कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी १ जुलैपासून आंदोलनाचे बिगुल: सुरेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:22 PM2018-06-26T18:22:56+5:302018-06-27T06:18:24+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासह सरकारने जाहीर केलेल्या योजनांची पूर्तता केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ १ जुलैपासून राज्यभर लढ्याचे बिगुल वाजवत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे रणशिंग फुंकले.
कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह सरकारने जाहीर केलेल्या योजनांची पूर्तता केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ १ जुलैपासून राज्यभर लढ्याचे बिगुल वाजवत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे रणशिंग फुंकले. आरक्षण, संरक्षण, शिक्षण या त्रिसूत्रीवर ‘मराठा क्रांती संघटना’ हे राज्यव्यापी व्यासपीठ स्थापन केल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राजर्षी शाहू जयंतीदिनी राज्यव्यापी मराठा क्रांती संघटनेच्या घोषणेसाठी आयोजित मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती राजू सावंत, प्रा. मधुकर पाटील, फत्तेसिंह सावंत, बाबा महाडिक, चंद्रकांत पाटील आदींची होती. यावेळी २३ जिल्ह्यांतील १७ मराठा संघटनांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत मराठा क्रांती संघटनेच्या स्थापनेची घोषणा पाटील यांनी केली.
सुरेश पाटील म्हणाले, मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेले नाही, सरकारने जाहीर केलेल्या योजनांमधील तुटपुंज्या योजनाच पूर्ण झाल्या आहेत. मराठा वसतिगृहांचा भत्ता कमी असून प्रत्येक जिल्ह्याला अद्याप वसतिगृहेच मिळालेली नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण, संरक्षण व शिक्षण या त्रिसूत्रीवर संघटना कार्यरत राहणार आहे.
१ जुलैपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा उभारला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जनजागरणही केले जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात शिफारशी लागू कराव्यात यासाठी ९ जुलैला पुण्यात मागासवर्गीय आयोग कार्यालय येथे ‘रोखठोक’ आंदोलन केले जाणार आहे.
त्याचबरोबर आरक्षणासाठी ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी राज्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करून महामार्ग रोखले जाणार आहेत. विजयानंद माने यांनी स्वागत केले. चंद्रकांत भराट यांनी प्रास्ताविक केले. भरत पाटील यांनी आभार मानले.
कार्यकारिणी अशी...
संस्थापक सुरेश पाटील (कोल्हापूर), कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट (औरंगाबाद), उपाध्यक्ष अजित पाटील व सचिव भरत पाटील (कोल्हापूर), खजानिस गोपाळ दळवी (मुंबई), कार्यकारिणी सदस्य किशोर देसाई (कल्याण), विजय पाटील (सातारा), महादेव साळुंखे (सांगली), चंद्रकांत सावंत (ठाणे), सुनीता पाटील व राणी पाटील (कोल्हापूर).
सदाभाऊंची अडचण नको म्हणून बाहेर
रयत क्रांती संघटनेतून का बाहेर पडला, या प्रश्नावर पाटील म्हणाले, काही महिन्यांपूर्वी मराठा संघर्ष समितीतर्फे कोल्हापुरात गोलमेज परिषद घेतली. त्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्याला बोलावून घेत तुम्ही मराठा समाजाचे काम करणार असाल तर सरकारवर वेडे-वाकडे आरोप होऊन मी अडचणीत येईन, असे सांगितले. त्यामुळे त्यांची अडचण नको; म्हणून मी संघटनेतून बाहेर पडलो.
मराठा महासंघ, सेवा संघाला टोला
मराठा संघटना आमच्याबरोबर असून मराठा महासंघ, मराठा सेवा संघ अशा बोटावर मोजणाऱ्या संघटना आमच्याबरोबर नसल्याचा टोला लगावत त्या स्वतंत्र अस्तित्व ठेवून काम करणार असतील तर आमचा पाठिंबाच राहील, असे पाटील यांनी सांगितले.