कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना वगळून शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संचालकांत धुसफूस 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:38 PM2023-10-11T13:38:49+5:302023-10-11T13:39:10+5:30

गूळ सौद्यासाठी ‘पणन’ मंत्र्यांना निमंत्रण

Kolhapur Agricultural Produce Market Committee chairman delegation to visit Chief Minister, director upset | कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना वगळून शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संचालकांत धुसफूस 

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना वगळून शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संचालकांत धुसफूस 

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहे. मागील वेळेला पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीलाही हे शिष्टमंडळ गेले होते; पण दोन्ही दौऱ्यात सभापती भारत पाटील-भुयेकर त्यांच्यासोबत नव्हते. सभापतींनी काढलेल्या अभ्यास दौऱ्यापासून संचालक मंडळातील अंतर्गत धुसफूस वाढल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनसुराज्य, शिवसेना, शिवसेना (ठाकरे गट) यांची समितीवर सत्ता आहे. संचालक मंडळ सत्तेत येऊन जेमतेम चार महिनेही झालेले नाहीत. तोपर्यंत संचालक मंडळात कुरघोडीचे राजकारण उफाळले आहे. समितीचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालताना दमछाक होते, यासाठी राज्यातील चांगल्या समित्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत? याची माहिती घेण्यासाठी सभापती भारत पाटील-भुयेकर, सचिव जयवंत पाटील व कर्मचारी अभ्यास दौऱ्यावर गेले होते. सभापतींसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून हा दौरा केल्याचे समिती प्रशासनाने सांगितले. मात्र, या दौऱ्यासाठी आम्हाला का नेले नाही, म्हणून काही संचालक आक्रमक झाले होते. तेव्हापासून संचालक मंडळात धुसफूस सुरू होती.

समिती आवारात रस्त्यांची कामांसाठी निधीसाठी उपसभापती शंकर पाटील यांच्यासह काही संचालकांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यास सांगिल्यानंतर बुधवारी उपसभापती पाटील व इतर संचालक मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. मात्र, या दोन्ही वेळेला सभापती पाटील-भुयेकर व काही संचालकांना बोलावले नसल्याचे समजते. यावरून, संचालकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, काम कसे करायचे, असा पेच प्रशासनासमोर आहे.

गूळ सौद्यासाठी ‘पणन’ मंत्र्यांना निमंत्रण

गूळ सौद्यासाठी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना उपसभापती पाटील यांनी निमंत्रित केले आहे. मात्र, बाजार समितीचे नेते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबत कोणतीच कल्पना दिलेली नाही. पालकमंत्र्यांना न विचारता परस्पर निमंत्रण देणारे तुम्ही कोण, अशी विचारणाही काही संचालकांनी केल्याचे समजते.

बाजार समितीला निधी मिळण्यासाठी आमची धडपड आहे. त्यातूनच पणन मंत्र्यांना भेटीस जाताना सभापतींसह इतरांना सोबत घेतले होते. मात्र, त्यांची बैठक पुण्यात असल्याने ते येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सभापती आमच्यासोबत येणार आहेत. - शंकर पाटील, उपसभापती, बाजार समिती

Web Title: Kolhapur Agricultural Produce Market Committee chairman delegation to visit Chief Minister, director upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.