कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: अकरा माजी संचालक ठरले अपात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:58 PM2023-04-07T12:58:43+5:302023-04-07T12:59:06+5:30
आठ जणांच्या अर्जावर स्वत:च्याच सह्या नाहीत
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अकरा माजी संचालकांसह एकूण ९० उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. यामध्ये माजी अध्यक्ष नंदकुमार वळंजू, शशीकांत आडनाईक, उदयसिंह पाटील कावणेकर, दशरथ माने या मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून २८ एप्रिलला मतदान आहे. माघारीनंतर निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. ६४५ इतक्या मोठ्या संख्येने अर्ज पात्र ठरले असून आता माघारीसाठी अनेकांची मनधरणी करण्याची वेळ येणार आहे.
बुधवारी दिवसभर बाजार समितीच्या कार्यालयात छाननी झाली. उमेदवारांनी वकील देऊन आपली बाजू मांडली. गुरूवारी दुपारी बारा वाजता पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्या आदेशानुसार लावण्यात आली. यावेळी चंद्रकांत ओतारी, मिलिंद ओतारी उपस्थित होते.
वळंजू यांचा अडते व्यापारी संघातून अर्ज होता. परंतु बाजार समितीचे येणे असल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आला. शशिकांत आडनाईक यांचे कृषी पतसंस्था, सर्वसाधारण आणि मागासवर्गीय प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा तीन गटातून अर्ज भरले होते. येणे बाकीच्या कारणावरून हे तीनही अर्ज बाद ठरवण्यात आले.
उत्तम धुमाळ (रा. बोरगाव ता. पन्हाळा), दशरथ माने (केर्ले ता. करवीर), उदयसिंग पाटील कावणे, संजय जाधव हणमंतवाडी ता. करवीर, आशालता पाटील म्हाकवे ता. कागल, नेताजी पाटील मांगोली ता. राधानगरी, अमित कांबळे भाटणवाडी ता. करवीर आणि हमाल मापाडी संघातून बाबूराव खोत यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे. महिला मतदार संघातील शेळेवाडीच्या संगीता पाटील यांचाही अर्ज बाद ठरला.
दहाही माजी संचालकांची येणे बाकी
या दहाही माजी संचालकांची बाजार समितीची येणे बाकी असल्यामुळे यांना अपात्र करण्यात आले आहे. आपण ज्या संस्थेत अध्यक्ष, संचालक म्हणून काम केले आहे. तिथली थकबाकी ठेवून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या या इच्छुकांना साधे नियमही माहिती नाहीत का अशी चर्चा बाजार समितीच्या आवारात सुरू होती.
आठ जणांच्या अर्जावर स्वत:च्याच सह्या नाहीत
एखादी निवडणूक लढवताना ती फारसा विचार न करता कशी लढवायचा निर्णय घेतला जातो याचे उत्तम उदाहरण छाननीच्या निमित्ताने समोर आले आहे. यातील आठ जणांनी उमेदवारी अर्जावर स्वत:ची सही ही केलेली नाही. विष्णू पाटील, रमेश चौगले, संदीप जामदार, सुभाष जाधव, मारूती झांबरे, मनिषा पाटील, उमेश शिगे, बाळासाेा दाईंगडे यांच्या अर्जावर सह्याच नाहीत. तर अनेकांनी ज्या गटातून अर्ज दाखल केले आहेत. त्या गटातील सूचक आणि अनुमोदकाची नावे आणि सह्या घेण्याचीही तसदी घेतलेली नाही.
राजकीय दबावापोटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज अपात्र ठरवले. याविरोधात जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील केले आहे. तसेच उच्च न्यायालयातही दाद मागणार आहे. - नंदकुमार वळंजू, माजी अध्यक्ष, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती
मतदारसंघनिहाय पात्र उमेदवार
अ) कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सह. संस्था मतदारसंघ
१ सर्वसाधारण प्रतिनिधी २८१
२ महिला प्रतिनिधी ५४
३ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रतिनिधी २२
४ इतर मागास. प्रतिनिधी ७८
ब) ग्रामपंचायत मतदारसंघ
५ सर्वसाधारण प्रतिनिधी १३३
६ अनु. जाती/जमाती प्रतिनिधी २१
७ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी २७
क) अडते व व्यापारी मतदारसंघ
८ अडते व व्यापारी मतदारसंघ १५
ड) हमाल व मापाडी मतदार संघ
९ हमाल व मापाडी मतदारसंघ १४
बाजार समितीचे अपात्र झालेले उमेदवार आणि त्यांची थकबाकी
- अमित कांबळे : १० लाख १० हजार रुपये
- उदयसिंग पाटील ४ लाख १४९
- संगीता पाटील २ लाख ८९ हजार ४७४
- आशालता पाटील २ लाख ८० हजार
- नेताजी पाटील १ लाख ९५ हजार ०६८
- शशिकांत आडनाईक १ लाख ५६ हजार
- नंदकुमार वळंजू १ लाख ५० हजार
- उत्तम धुमाळ ७७ हजार ०४५
- दशरथ माने ५६ हजार ८५९
- संजय जाधव ५६ हजार ६५६
- बाबूराव खोत ५० हजार