कोल्हापूर बाजार समितीवर ‘मुश्रीफ, सतेज, पी. एन.’ यांची पकड

By राजाराम लोंढे | Published: September 8, 2022 12:02 PM2022-09-08T12:02:00+5:302022-09-08T12:02:44+5:30

खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके यांना सोबत घेऊन कोरे-महाडिक तगडे आव्हान उभे करू शकतात.

Kolhapur Agricultural Produce Market Committee MLA Hasan Mushrif, Satej Patil and P. N. Patil dominance | कोल्हापूर बाजार समितीवर ‘मुश्रीफ, सतेज, पी. एन.’ यांची पकड

कोल्हापूर बाजार समितीवर ‘मुश्रीफ, सतेज, पी. एन.’ यांची पकड

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : विकास संस्था व ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्या पाहता कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीवर आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांची पकड घट्ट राहणार आहे. या आघाडीत आमदार विनय कोरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र, राज्यातील सत्तांतराचे पडसाद उमटणार असून कोरे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून भाजप दोन्ही काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करेल. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके यांना सोबत घेऊन कोरे-महाडिक तगडे आव्हान उभे करू शकतात.

समितीच्या २०१५ च्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’, आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ‘राजर्षी शाहू आघाडी’ तर खासदार संजय मंडलिक, चंद्रदीप नरके, अमल महाडिक व राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी’ अशी तिरंगी लढत झाली होती. १९ पैकी तब्बल १६ जागा जिंकत ‘मुश्रीफ, कोरे, सतेज पाटील यांच्या आघाडीने सत्तेची हॅट्ट्रिक साधली होती तर ‘शिवशाहू’ आघाडीचे तीन सदस्य तर नंदकुमार वळंजू यांच्या रूपाने अपक्ष सदस्य निवडून आले.

गेल्या पाच वर्षात सत्तारुढ गटाचा कारभार अनेक कारणांनी गाजला. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये समितीवर अशासकीय मंडळ आले. पन्हाळावगळता विकास संस्था व ग्रामपंचायतीवरील सत्ता पाहता समितीवर आजपर्यंत दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व असले तरी आमदार मुश्रीफ यांनी विनय काेरे यांना नेहमीच सोबत घेतले आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली आहे. ‘महाडिक-काेरे-प्रकाश आवाडे’ यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोट बांधली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या तिघांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे करण्याचा भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, आमदार मुश्रीफ यांनी मुत्सद्दीगिरीच्या बळावर सगळ्यांना सोबत घेऊन पॅनेल बांधले. मात्र बँकेच्या निवडणुकीत आवाडे यांचा पराभव व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा विजयी कोरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याबाबत कोरे व आवाडे यांनी उघड नाराजी व्यक्त करत भविष्यातील राजकारणात त्याचा हिशेब चुकता करण्याचा इशारा दिला आहे. यासह राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीची निवडणूक होत आहे.

समितीची निवडणुकीतही विनय काेरे, संजय मंडलिक यांना सोबत ठेवण्याचा हसन मुश्रीफ यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र, कोरे-मंडलिक यांच्या नेतृत्वाखालीच विरोधी पॅनेल करण्याची रणनीती भाजपची असू शकते.

विकास संस्थांची तालुकानिहाय ताकद-

कागल- हसन मुश्रीफ

करवीर- पी. एन. पाटील

गगनबावडा - सतेज पाटील

राधानगरी - ए. वाय. पाटील

भुदरगड- के. पी. पाटील

पन्हाळा- विनय काेरे

शाहूवाडी- मानसिंगराव गायकवाड

अशा आहेत जागा

विकास संस्था सदस्यांमधून - ११ (पैकी ७ सर्वसाधारण, २ महिला, १ इतर मागास, १ भटक्याविमुक्त जाती)

ग्रामपंचायत सदस्यांमधून - ४ (पैकी २ सर्वसाधारण, १ अनूसूचित जाती, १ आर्थिक दुर्बल)

व्यापारी, अडते - २

हमाल, तोलाईदार- १

असे आहे तालुकानिहाय मतदान-

तालुका        विकास संस्था सदस्य        ग्रामपंचायत सदस्य

करवीर            २,८४४                       १,३१४

राधानगरी         २,१४४                       ८९५

भुदरगड           २,२०७                       ७९०

शाहूवाडी         १,०८२                       ९२१

पन्हाळा          २,७३४                        १,०२४

कागल           १,१९९                        ४५२

गगनबावडा      ६६१                           २३७

एकूण            १२,८७१                      ५,६३३

अडते व व्यापारी  १,१८८

हमाल व तोलाईदार  ७४३

Web Title: Kolhapur Agricultural Produce Market Committee MLA Hasan Mushrif, Satej Patil and P. N. Patil dominance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.