कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पोलिस बंदोबस्तात गुळाचे सौदे, हमाली वाढीचा गुंता 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 02:25 PM2023-01-06T14:25:08+5:302023-01-06T14:25:37+5:30

५० टक्के हमाली वाढीवर हमाल ठाम, ऐन संक्रांतीत शेतकऱ्यांचा गूळ कडू ?

Kolhapur Agriculture Produce Market Committee Bargains for Jaggery under Police Arrangement | कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पोलिस बंदोबस्तात गुळाचे सौदे, हमाली वाढीचा गुंता 

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पोलिस बंदोबस्तात गुळाचे सौदे, हमाली वाढीचा गुंता 

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमधील हमाली वाढीचा गुंता वाढत चालला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेली बैठकीत चर्चा फिस्कटल्याने शेतकरी व व्यापारी आक्रमक झाले आहेत. आमच्या गुळाची व्यवस्था आम्ही करतो, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली तर हमाल पुरवण्याबाबत समिती प्रशासनाने माथाडी बोर्डाला पत्र दिले आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात आज, शुक्रवारी गुळाचे सौदे काढले जाणार आहेत.

बाजार समितीत व्यापारी व अडत्यांच्या हमालांनी हमाली वाढीसाठी गेली दोन दिवस काम बंद केले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये ५० टक्के हमाली वाढीवर हमाल ठाम राहिले. तर एक रुपयाही वाढ देण्यास शेतकरी व व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.

तब्बल दीड तासाच्या मॅरेथॉन चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. गुऱ्हाळघरावरील मजूर आणून आमचा आम्ही गूळ उतरण्याची तयारी शेतकऱ्यांनी घेतली. बाजार समितीने आजच्या सौद्यासाठी पोलिस मागवले असून, बंदोबस्तात गुळाचे सौदे काढले जाणार आहेत. बैठकीला जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, समितीचे सचिव जयवंत पाटील, व्यापारी असाेसिएशनचे विक्रम खाडे, अतुल शहा आदी उपस्थित होते.

गुऱ्हाळघरात गूळ रव्यांच्या थप्या

गेली तीन दिवस गुळाचे सौदे होऊ शकलेले नाहीत. मंगळवारच्या गूळ बाजार समितीत पडून आहे. तर दोन दिवसांत उत्पादन केलेल्या गूळ रव्यांच्या थप्या गुऱ्हाळघरात लागल्या आहेत.

ऐन संक्रांतीत शेतकऱ्यांचा गूळ कडू ?

संक्रांतीच्या सणाला गुळाची मागणी वाढते. परिणामी, दर चांगला मिळतो. यंदा गुळाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आतबट्यात आले आहेत. त्यातच दर चांगला मिळण्याच्या कालावधीतच हमालांनी संप केल्याने ऐन संक्रांतीत शेतकऱ्यांचा गूळ कडू होऊ लागला आहे.

हमालांना कारणे दाखवा नोटिसा

गुळाचा हंगाम सुरू असतानाच अचानक संप केल्याने हंगाम विस्कळीत झाला आहे. याबद्दल बाजार समितीने हमालांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
 

Web Title: Kolhapur Agriculture Produce Market Committee Bargains for Jaggery under Police Arrangement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.