कोल्हापूर : ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले शहर, भगवान महावीर जयंती उत्सहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 06:30 PM2018-03-29T18:30:29+5:302018-03-29T18:30:29+5:30
भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर : भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर जयंती निमित्त सकाळी गंगावेश येथील मानस्तंभ जिन मंदिरात सकाळी साडेसात वाजता भगवान महावीरांचा पंचामृत अभिषेक झाला. त्यानंतर महावीर जन्मकाळ सोहळा साजरा केल्या. सकाळी नऊ वाजता भट्टारकरत्न डॉ. लक्ष्मीसेन महाराज यांच्या हस्ते यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. त्यानंतर समस्त जैन समाजातर्फे काढण्यात आलेल्या मुख्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. याप्रसंगी नगरसेवक ईश्वर परमार, रत्नेश शिरोळकर, किरण शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापुरात भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी समस्त जैनबांधवांच्यावतीने गंगावेश ते दसरा चौक येथे पालखी व रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.(छाया : आदित्य वेल्हाळ)
‘महावीर भगवान की जय’, ‘जैन धर्म की जय’, ‘अहिंसा परमो: धर्म की जय..’असा जयघोष, रथात फुलांनी सजवलेल्या रथात भगवान महावीरांची मूर्ती, ‘जगा आणि जगू द्या’चे संदेश देणारे चित्ररथासह मिरवणुकीच्या सुरुवात झाली. मिरवणुकीत भगवान महावीरांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’चा संदेश चित्ररथाद्वारे साकारण्यात आला होता.
गंगावेशमधील मानस्तंभ मंदिर, कसबा गेट, शिवाजी चौक, बिंदू चौक, गुजरी, पापाची तिकटी, पानलाईन, महापालिका चौक, अयोध्या टॉकीजमार्गे दिगंबर जैन मंदिर दसरा चौक येथे मिरवणूक विसर्जित झाली. याठिकाणी भगवान महावीरांचा अभिषेक, पूजा व आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.
दिगंबर जैन बोर्डिंग येथे दुपारी चार वाजता अब्दुल अजिज. यु. राजपूत विजापूर यांचे ‘उत्तर कर्नाटक के पौराणिक जैन बसदि’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर विविध स्पर्धेचे बक्षिस वितरणसह समाजातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला - मुलींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भरत सांगरूळकर, सुरेश मगदूम, आनंद पाटणे, सुनिल दुणूंग, शरद पाटील, सुरेश मगदूम, गुणवंत रोटे, डॉ. सुषमा रोटे यासह समाजातील श्रावक - श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.