कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 06:30 PM2021-07-17T18:30:18+5:302021-07-17T18:33:02+5:30
Airplane Gujrat Kolhapur : वाढत्या कोरोना संसर्गामुळे बंद झालेली इंडिगो कंपनीची कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा शनिवारपासून पूर्ववत झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी ६० टक्के प्रतिसाद दिला.
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे बंद झालेली इंडिगो कंपनीची कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा शनिवारपासून पूर्ववत झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी ६० टक्के प्रतिसाद दिला.
कोल्हापुरातील व्यापारी, उद्योजकांचा व्यापाऱ्यानिमित्त गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठा संर्पक आहे. त्यातून अनेकदा व्यापारी वर्ग येथून पुणे अथवा मुंबईला बस, खासगी वाहनातून जात असे. तेथून विमानाने अहमदाबादला जात असे. यासह कोल्हापूर ते अहमदाबाद रेल्वेनेही जाणे होत असे. त्यातून अर्थिक व वेळ वाया जात होता. ही बाब जाणून २२ फेब्रुवारी २०२१ पासून विमान सेवा सुरू झाली.
सेवेच्या पहिल्या दिवसापासून या विमानसेवेला चांगला प्रतिसाद कोल्हापूरसह अहमदाबादमधील व्यापारी वर्गाने दिला. त्यामुळे ही सेवा व्यापारी वर्गात अल्पावधीतच पसंतीला पडली. काही दिवस सेवा सुरळीत सुरू असताना अहमदाबादमध्ये महिनाभरातच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली. ही बंद झालेली विमान सेवा शनिवारपासून पूर्ववत झाली.
आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. शनिवारी सकाळी इंडिगोचे हे विमान अहमदाबादवरून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण घेतले. ते कोल्हापुरात सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास उतरले. त्यानंतर काही मिनिटांची विश्रांती घेऊन सुमारे १० वाजून ४० मिनिटांनी हे विमान कोल्हापुरातून पुन्हा अहमदाबाद कडे झेपावले. दुपारी ते साडेबारा ते पाऊण वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथे पोहोचले.