कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा उद्यापासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:17+5:302021-07-16T04:17:17+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा शनिवार (दि. १७)पासून पूर्ववत सुरू होणार आहे. ही सेवा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ...
कोल्हापूर : कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा शनिवार (दि. १७)पासून पूर्ववत सुरू होणार आहे. ही सेवा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी प्रवास करण्यास व्यापारी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावरील विमानसेवा स्थगित होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या मार्गावरील सेवा स्थगित करण्यात आली होती. हा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोल्हापूर - अहमदाबाद मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. त्यानुसार शनिवारपासून संबंधित सेवा पूर्ववत सुरू होईल. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शनिवार यादिवशी ही सेवा सुरू राहणार आहे. यादिवशी अहमदाबाद येथून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी निघणारे विमान कोल्हापूरमध्ये सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. कोल्हापूरमधून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी निघणारे विमान हे दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.
चौकट
प्रवाशांना दिलासा
कोल्हापूरमधून अहमदाबाद, राजकोट, सुरतला जाणाऱ्या कापडासह अन्य व्यापारी, व्यावसायिक, आदी प्रवाशांना ही विमानसेवा सुरू होण्यामुळे दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत साधारणत: अहमदाबाद ते कोल्हापूरसाठी २६, तर कोल्हापूर ते अहमदाबादसाठी ३१ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होईल, असे पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी गुरूवारी सांगितले.