सातारकरांसाठी कोल्हापूरचा विमान लई भारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 08:23 PM2017-09-14T20:23:12+5:302017-09-14T20:29:34+5:30
सातारा : पर्यटनाबरोबरच कार्यालयीन कामासाठी हवाईसफर करणाºया सातारकरांना पुण्याच्या ट्रॅफिकपेक्षा सुसाट कोल्हापूरचे विमानतळ अधिक भावले, अशी माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
सातारा : पर्यटनाबरोबरच कार्यालयीन कामासाठी हवाईसफर करणाºया सातारकरांना पुण्याच्या ट्रॅफिकपेक्षा सुसाट कोल्हापूरचे विमानतळ अधिक भावले, अशी माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
कोल्हापूर-मुंबई विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. विमानसेवा सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून आॅपरेटिंग लायसन्स मिळविण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठी हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाल्याने सातारकरांना विमानाने प्रवास करण्यासाठी कोल्हापूर सोपे का पुणे, याविषयी ‘लोकमत’ने सर्व्हे केला.
सातारा-पुणे आणि सातारा-कोल्हापूर हे अंतर सुमारे ११० किलोमीटरचे आहे. कोल्हापूर आणि पुण्याचे अंतर एकसारखे असले तरीही कात्रज घाट ओलांडल्यानंतर पुणे शहरात विमानतळापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक तासाचा वेळ लागतो. त्यातही कार्यालय सुरू आणि बंद होण्याच्या वेळेत तर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. प्रवास आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे कोल्हापूर विमानतळाकडे सातारकरांचा ओढा असणार हे नक्की!
विमान प्रवास कशासाठी
गेल्या काही वर्षांत सातारकरांचा विमानाचा प्रवास वाढल्याचा दिसतो. वर्षातून एकदा पर्यटनाच्या निमित्ताने सहकुटुंंब विमान प्रवास करण्याची मानसिकता सातारकरांमध्ये वाढू लागली आहे. मुलांच्या सुट्या आणि पालकांच्या उद्योग व्यवसायाचा ताळमेळ बसवून या सुट्यांचे नियोजन केले जाते. तीन महिने आधी विमानाचे तिकीट काढल्याने रेल्वेच्या प्रथम श्रेणीतील प्रवासा इतका खर्च वाचतो. रेल्वेने दोन-तीन दिवसांचा प्रवास करण्याऐवजी विमानाने अवघ्या दोन तासांत प्रवास होत असल्याने त्याला पसंती दिली जाते.
पार्किंगसाठी कोल्हापुरी पाहुण्यांचा शोध !
प्रत्येक विमानतळावर पार्किंगची व्यवस्था आहे. पण येथे गाडी पार्क करायला तासाच्या हिशेबाने दर घेतला जातो. त्यामुळे विमानतळावर पार्किंग करण्याकडे प्रवाशांचा ओढा नसतो. विमानतळाबाहेरच गाड्या लावून आपल्या फ्लाईटची प्रतीक्षा करणं याकडे अनेकांचा कल असतो. अनेक सातारकरांचे पाहुणे पुण्यात राहतात. त्यामुळे ज्यांना विमानाने प्रवास करायचा आहे आणि गाडीही पुण्यातच ठेवायची आहे. ते पुण्यातील पाहुण्यांची मदत घेतात आणि गाडी त्यांच्या ताब्यात देतात. कोल्हापूरला हवाईसेवा सुरू झाल्यावर कोल्हापुरातील पाहुणे शोधण्याची वेळ सातारकरांवर येणार आहे.
विमानप्रवासाचा एकूण खर्च!
सातारा-पुणे चारचाकीने प्रवास करायचा म्हटलं तर बाराशे ते दीड हजार रुपयांचा खर्च येतो. तिथून पुढे विमाननगरला जायचे म्हटले की, शे-पाचशे रुपये वाढीव. हाच प्रवास सातारा-कोल्हापूर करायचा म्हटलं तर बाराशे-तेराशे रुपयांमध्ये होऊ शकतो. कोल्हापूरचे विमानतळ मुख्य रस्त्यावरच असल्याने येथे जाताना अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत नाही. विमानाचे तिकीट सरासरी अडीच हजार आणि विमानतळापर्यंतचा प्रवास खर्च सरासरी एक सारखाच येतो.