कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवा, रस्त्यांचे रुंदीकरण करा - शाहू छत्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:34 PM2024-09-10T13:34:39+5:302024-09-10T13:35:20+5:30
कोल्हापूर विमानतळावर विमान प्रशिक्षण सेंटरचा प्रस्ताव
कोल्हापूर : उजळाईवाडी विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणासह रस्त्याच्या दोन्ही बाजूने पथदिवे लावावेत, अशा सूचना सोमवारी झालेल्या बैठकीत खासदार शाहू छत्रपती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
उजळाईवाडी विमानतळ सल्लागार समितीची २०२४ या वर्षाची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस., महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, करवीर प्रांताधिकारी हरिश धार्मिक, विमानतळ संचालक अनिल शिंदे यांच्यासह सल्लागार समिती सदस्य व्ही.बी. पाटील, किरण पाटील, तेज घाटगे, पार्थ नागेशकर, उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे तसेच संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासह नवीन हवाई मार्गावर विमानसेवा सुरु करणे, विमानतळावरील कार्गो सुविधा, महामार्ग ते विमानतळ रस्ता व पथदिवे, प्रवाशांना बस सुविधा पुरविणे, विमानतळ परिसरातील दोन गावांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी मुद्द्यांसह इतर महत्वाच्या तांत्रिक मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाली.
विमानतळाच्या धावपट्टीचे रुंदीकरण तातडीने पूर्ण करावे तसेच विमानतळाकडे जाणारे सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे, या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पथदिवे बसवावेत. त्याचीही प्रक्रिया तातडीने राबवावी, अशा सूचना शाहू छत्रपती यांनी दिल्या. प्रवाशांना विमानतळावर आल्यानंतर चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात असेही त्यांनी सांगितले.
विमानतळावरून कोल्हापूर शहरात येणासाठी ऑटोरिक्षांसह अन्य वाहनचालकांकडून जादा भाडे घेतले जात असल्याच्या तक्रारीवर बैठकीत चर्चा झाली. जर वाहनधारक भरपूर भाडे आकारत असतील तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला. त्यावेळी केएमटी प्रशासनाने विमानाच्या वेळेत बस सुरु ठेवण्याची सूचना पुढे आली. त्यावेळी मंजूलक्ष्मी यांनी, केएमटीकडे सध्या बस संख्या कमी असल्याने आता तातडीने बस उपलब्ध करुन देणे अशक्य आहे. पण जेव्हा शंभर ई बसेस येतील तेव्हा ही सुविधा देता येऊ शकते असे सांगितले.
विमान प्रशिक्षण सेंटरचा प्रस्ताव
विमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर परवानगी देण्याकरिता मुंबईतील एका खासगी कंपनीने प्रस्ताव दिला आहे. याबाबत सर्व बाबींची पूर्तता करून लवकरच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे संचालक अनिल शिंदे यांनी बैठकीत सांगितले. त्यानुसार १८ सप्टेंबरच्या दरम्यान याबाबत बैठक घेऊन, विमान प्रशिक्षण देण्याकरिता लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक शिंदे यांनी दिली.