कोल्हापूर विमानतळ नव्या इमारतीचे १० मार्चला उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:11 PM2024-03-05T12:11:25+5:302024-03-05T12:13:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन, कोल्हापूरमध्ये फडणवीसांची उपस्थिती
कोल्हापूर: येथील विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन रविवार दि. १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समारंभासाठी कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. सकाळी ११ च्या सुमारास हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाने कोल्हापूरसह अन्य महत्त्वाच्या विमानतळांच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. यामध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचाही समावेश होता. यासाठी खासदार महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनीही त्यांच्या गेल्या वर्षभरातील कोल्हापूर दौऱ्यामध्ये विमानतळाच्या कामाकडे जातीने लक्ष दिले होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या या ऐतिहासिक दिसणाऱ्या इमारतीचे उद्घाटन आता रविवारी होणार आहे.
यासाठी सिंदिया यांनी महाडिक यांना या कार्यक्रमासाठी विमानतळावर उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावरील इमारतींचे याच दिवशी लोकार्पण होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात तर फडणवीस कोल्हापुरात उपस्थित राहणार आहेत.