कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीचे काम १० डिसेंबरपर्यंत होईल, प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:24 PM2023-11-27T15:24:23+5:302023-11-27T15:24:43+5:30
विमानतळावर आयएलएस सिस्टीम
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम येत्या १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांनी रविवारी खासदार धनंजय महाडिक यांना दिली. एक दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या संजीवकुमार यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगची पाहणी केली. यावेळी त्यांनी टर्मिनल बिल्डिंगच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. दरम्यान, या बिल्डिंगचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले.
गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचीही त्यांनी जवळपास एक तास फिरून पाहणी केली. दर्शनी भागात दिला जाणारा ऐतिहासिक लूक, इमारतीमधील व्हीआयपी लाउंज, अंतर्गत सुविधा यांची बारकाईने पाहणी केली. काही किरकोळ सूचनाही संबंधितांना दिल्या. तत्पूर्वी, खासदार धनंजय महाडिक यांनी संजीवकुमार यांचे स्वागत केले. यावेळी खा. महाडिक यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूरला आवश्यक असणाऱ्या नवीन विमानसेवा आणि विमानतळाविषयी असणाऱ्या समस्या मांडल्या. यावेळी विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे, समीर शेठ, प्रशांत वैद्य आदी उपस्थित होते.
लोकार्पणाचा मुहूर्त डिसेंबरअखेर
या दौऱ्यात संजीवकुमार यांनी टर्मिनल बिल्डिंगच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. इमारतीमधील अंतर्गत कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील. मात्र, दर्शनी भागातील ऐतिहासिक लूकचे काम पूर्ण होण्यास आणखी १० दिवस लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पणाची तारीख ठरविली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, यासाठी आतापासून प्रयत्न करत असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले.
विमानतळावर आयएलएस सिस्टीम
हे विमानतळ अत्याधुनिक हवाई सोयी-सुविधांनी परिपूर्ण व्हावे, यासाठीही या विमानतळावर आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. पावसाळी हवा किंवा दाट धुक्यामुळे कमी झालेल्या दृश्यमान स्थितीमध्ये विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी ही सिस्टीम उपयुक्त आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा खंडित होणार नाही
कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा खंडित होणार नाही, यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रयत्न करत आहे. नांदेड, नागपूर, शिर्डी, इंदोर, गोवा या मार्गावर हवाई सेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. सध्या बंद असणारी कोल्हापूर- अहमदाबाद हवाईसेवा जानेवारी अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा खंडित होणार नाही. याबाबत संजीवकुमार यांच्याशी चर्चा केली आहे. आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. -धनंजय महाडिक, राज्यसभा सदस्य.