कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव
By समीर देशपांडे | Published: June 4, 2023 12:58 PM2023-06-04T12:58:12+5:302023-06-04T12:58:37+5:30
ज्याेतिरादित्य शिंदे यांनी दिली माहिती. शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. रविवारचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रम त्यांनी केले. पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, कालच मी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनस इमारतीच्या कामाची पाहणी केली. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून याबाबत प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे आला आहे. आमच्या कार्यालयाकडून तो मंजूर करून आता केंद्रीय मंत्रीमंडळासमोर आणण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात येईल.
ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये क्रांतीकारी परिवर्तन झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत अव्वल होत असून प्रगतीचे आकडे थक्क करणारे आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवून भारत हा जगातील एक नक्षत्र बनला आहे. २०१४ च्या आधी ६८ वर्षात देशात इकूण विमानतळ ७४ होती. केवळ ९ वर्षात आणखी ७४ विमानतळे झाली असून ही संख्या २२० पर्यंत नेण्यात येणार आहे. पूर्वी प्रतिदिन १३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बनवला जात होता. आता त्याच्या तिप्पट म्हणजे ३६ किलोमीटर प्रतिदिन महामार्ग बनवला जात आहे. कोरोनाच्या काळात प्रगत देशांमध्ये हातात केसपेपर घेवून नागरिक फिरत असताना भारतात मोबाईलवर कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी मोदी यांनी करून दाखवली आहे.
दूध का दूध, पानी का पानी
दिल्लीतील खेळाडूंच्या आंदोलनाविषयी विचारले असता, ते म्हणाले, सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे तो निकाल आल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ हो जाएगा.