कोल्हापूर विमानतळावर आजपासून 'नाईट लँडिंग' होणार, विस्तारित धावपट्टी पूर्ण क्षमतेने वापरता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:10 PM2022-11-03T12:10:52+5:302022-11-03T12:12:45+5:30
धावपट्टी विस्तारित झाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन विमानाला कोल्हापुरात लँडिंग, टेकऑफ करता येणार आहे.
कोल्हापूर : येथील विमानतळावरील विस्तारित धावपट्टी आज, बुधवारपासून पूर्ण क्षमतेने वापरता येणार आहे. नाईट लँडिंग सुविधाही सुरू होणार आहे. विमानांना योग्य दिशा दाखविणाऱ्या अद्ययावत उपकरणांची सेवाही उपलब्ध होईल.
या विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिली. त्यामध्ये पूर्वीची १३७० मीटरची धावपट्टी आता विस्तारीकरणानंतर १७८० मीटरची झाली आहे. त्यावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होईल. धावपट्टीवरील मार्किंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते बुधवारी रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या लाइट्सची चाचणी घेतली जाईल. तंत्रज्ञांद्वारे त्याचे सर्वेक्षण झाल्यानंतर गुरुवारपासून विस्तारित धावपट्टी पूर्ण क्षमतेने वापरता येईल. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होईल. धावपट्टी विस्तारित झाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन विमानाला कोल्हापुरात लँडिंग, टेकऑफ करता येणार आहे.
ॲप्रनची क्षमता वाढल्याने आता तेथे तीन एटीआर, एक एअरबस थांबविण्याची व्यवस्था झाली आहे. विमानतळाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या विमानांना धावपट्टीचे ठिकाण, योग्य दिशा दाखविणाऱ्या, धुक्यामध्ये लँडिंग, टेकऑफसाठी मदत करणाऱ्या अद्ययावत उपकरणांचा वापर करण्यास डीजीसीएने परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी दिली.
या सुविधा उपलब्ध होणार
विमानतळावर न्यू ॲप्रन, आयसोलेशन-वे, टॅक्सी-वे यांची कामे पूर्ण झाली आहेत. विस्तारित धावपट्टी, नाइट लँडिंग सुविधेमुळे रात्रीच्या वेळी कोल्हापुरात विमाने पार्किंग करता येतील. त्यासह येथून सकाळी मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, तिरुपती, दिल्ली आदी ठिकाणी विमाने घेऊन जाता येतील. ॲप्रनमुळे एअरबस, दोन एटीआर, छोटे विमाने थांबविता येतील. कोल्हापूर विमानतळ आणि सेवेच्या विकासाला गती मिळणार असल्याचे विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.