कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 04:25 PM2024-03-13T16:25:40+5:302024-03-13T16:26:06+5:30

आईएलएस सिस्टीम, हँगरची विमान कंपन्यांकडून मागणी

Kolhapur airport will require about 27 acres of additional space for take off and landing of Boeing aircraft | कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार

कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार

सचिन यादव

कोल्हापूर : कोल्हापूरच्याविमानतळावर बोईंग विमानांचे (१८० प्रवासी क्षमता) टेक ऑफ आणि लँडिंग होण्यासाठी सुमारे २७ एकर वाढीव जागा अजून संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात जागेच्या दरावरून चर्चा सुरू आहे. सध्याच्या बाजार भावाने जागेचा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अपेक्षित जागा मिळाल्यास धावपट्टी १७८० मीटर वरून २३६० मीटरची झाल्यास बोईंग विमाने कोल्हापुरातून धावणार आहेत. सध्या ७२ आसनांची विमान सेवा सुरू आहे.

सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १७८० मीटर आहे. रनवे एक्स्टेडंट सरफेस एरिया (रेसा) साठी १५० मीटर अधिक धावपट्टी वाढवावी लागणार आहे. तर रेसासह बोईंगसाठी एकूण ४३० मीटरसाठी वाढीव जमीन संपादनाची गरज आहे. म्हणजे एकूण २३६० मीटरची धावपट्टीची गरज आहे. अनेकदा विमानाचे लँडिंग होताना मूळ धावपट्टीच्या पुढे विमान धावते. त्या ठिकाणी मुरुम टाकला जातो. विमानाची गती कमी होऊन थांबण्यासाठी रेसाची गरज भासते.

टर्मिनल इमारतीत वाढीव प्रवासी संख्या लक्षात घेऊन आसन व्यवस्था केली आहे. भविष्यात उद्योग, व्यापार, पर्यटनासह कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. त्यादृष्टीने मोठी विमाने येण्यासाठी विस्तारित धावपट्टीची गरज आहे.

हँगरची मागणी

सध्या काही विमान कंपन्यांनी हँगरसाठी २ एकर जागेची मागणी केली आहे. विमानांचा मेटेंनन्स करण्यासाठी हँगर लागतो. हँगरची सुविधा विमानतळ प्राधिकरणाने करून द्यावी, अशी मागणी काही विमान कंपन्यांनी केली आहे. हँगरसाठी ३ एकर जागा देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे.

सध्या सुरू असलेल्या विमानसेवा

इंडिगो कंपनी : कोल्हापूर ते बंगळुरू, हैदराबाद
स्टार एअरवेज : कोल्हापूर ते मुंबई, बंगळुरू

ढगाळ वातावरण, धुके आणि पावसातही विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होण्यासाठी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची गरज आहे. रनवे संपल्यानंतर सुमारे ४०० मीटर अंतरावर ही यंत्रणा लागते. सॅटेलाइटद्वारा ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते.

एटीसी टाॅवर केबलिंग

एटीसी टाॅवरच्या केबलिंगच्या कामालाही सुमारे दोन महिने लागण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने एटीसी टाॅवर कार्यान्वित होऊ शकेल.

कोल्हापूरच्या विमानतळासाठी २५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. दरवर्षी सुमारे ५ लाख प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कोल्हापूर विमानतळाची आहे. -पीयूष श्रीवास्तव, वरिष्ठ सचिव, विमानतळ प्राधिकरण
 

रनवे २३६० मीटर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाच्या पातळीवर वाढीव भूमी संपादनाचे काम सुरू आहे. टर्मिनल इमारतीत एप्रिल महिन्यात गुढीपाडवा किंवा रामनवमीच्या दिवशी कामकाजास सुरुवात होण्याची शक्यता आहे. -समीर शेठ, सल्लागार समिती सदस्य, विमानतळ प्राधिकरण, आईएलएस सिस्टीम

Web Title: Kolhapur airport will require about 27 acres of additional space for take off and landing of Boeing aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.