भारतीय व्हॉलीबॉल संघाला कोल्हापुरी बळ, अजित पाटील यांची प्रशिक्षकपदी निवड
By सचिन भोसले | Published: September 20, 2023 05:07 PM2023-09-20T17:07:53+5:302023-09-20T17:09:06+5:30
कोल्हापूर : भारतीय महिला व्हाॅलीबाॅल संघाने बँकाक (थायलंड) येथे झालेल्या आशियाई महिला व्हाॅलीबाॅल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवून सातवा क्रमांक पटकाविला. ...
कोल्हापूर : भारतीय महिला व्हाॅलीबाॅल संघाने बँकाक (थायलंड) येथे झालेल्या आशियाई महिला व्हाॅलीबाॅल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवून सातवा क्रमांक पटकाविला. ही किमया केवळ कोल्हापूरचे अजित पाटील यांचे प्रशिक्षण लाभल्यानंतर साधली. कारण आतापर्यंत संघाचे स्थान दहाच्या आतमध्ये येत नव्हते. या कामगिरीची दखल भारतीय व्हाॅलीबाॅल महासंघाने चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पुन्हा त्यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली.
मूळचे बाचणीचे (ता. कागल) रहिवासी असलेले अजित पाटील हे गेली चाळीस वर्षे केवळ व्हाॅलीबाॅल खेळात मुले, मुली पारंगत व्हावीत, यासाठी जिवाचे रान करीत आहेत. या खेळातील खेळाडूंना मदतीसाठी त्यांनी स्वत:चे रान आणि घरही विकले आहे. त्यांच्या चाळीस वर्षांच्या कष्टाला फळ आले आहे. आतापर्यंत भारतीय कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापूर्वी त्यांच्या खांद्यावर पडत होती.
यंदा प्रथमच कोल्हापूरकरांना नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली आहे. त्यांची चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय महिला व्हाॅलीबाॅल संघाच्या पुन्हा प्रशिक्षकपदी निवड झाली. त्यांनी बंगळुरू येथे झालेल्या तीस दिवसांच्या सराव शिबिरात कोणताही हातचा न राखता २८ जणींच्या संघाला प्रशिक्षण दिले. त्यातून १२ जणींचा संघ निवडला. यादरम्यान तीन दिवसांचे बँकाॅक (थायलंड) येथे सराव शिबिर झाले. त्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मात करीत संघाचे मानांकन ७ व्या क्रमांकावर आणले. आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.
अशीही खंत
महाराष्ट्रात व्हाॅलीबाॅलला पोषक वातावरण आहे. मात्र, शासनाच्या सुविधा नाहीत. क्रीडा प्रबोधिनीत या खेळाचा समावेश नाही. तो करावा. राज्यात अनेक चांगले प्रशिक्षक आहेत. पण सुविधा नाहीत. सुविधा पुरविल्यानंंतर राज्यातील खेळाडूही राष्ट्रीय संघात दिसतील, असे मत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील यांनी व्यक्त केले.