कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सर्व वाहनांना प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:32 PM2018-10-06T13:32:17+5:302018-10-06T13:37:01+5:30
कोल्हापूर येथील शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या परिसरात सर्व वाहनांना पार्किंगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
कोल्हापूर : येथील शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या परिसरात सर्व वाहनांना पार्किंगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांना चांगली सुविधा मिळावी, या दृष्टीने पोलिसांनी हे नियोजन केले आहे, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी केले आहे.
शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दि. १० ते १८ आॅक्टोबरअखेर मोठ्या प्रमाणात नवरात्रौत्सव साजरा होत आहे. मंदिराची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मंदिर परिसरात शिवाजी चौक ते भवानी मंडप या मार्गावर एकाही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरातील सर्व वाहनतळ इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत.
हा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. या परिसरात वाहन पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक नियोजनास वाहनचालक व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गुजर यांनी केले आहे.
मोटार वाहन पार्किंग व्यवस्था
शिवाजी स्टेडियम, सर्व प्रकारची मोटार वाहने, प्रायव्हेट हायस्कूल- चारचाकी, एम. एल. जी. हायस्कूल- दुचाकी, मेन राजाराम हायस्कूल- दुचाकी, चारचाकी, दसरा चौक मैदान- मिनी आरामबस, सिद्धार्थनगर मैदान- आरामबस, मिनी बसेस, पंचगंगा घाट- आरामबस, मिनी बसेस, गांधी मैदान- सर्व प्रकारची वाहने, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मैदान- चारचाकी, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील मोकळी जागा- आरामबस, मिनी बसेस, बिंदू चौक-चारचाकी, मैलखड्डा (निर्माण चौक), सुसूरबाग मैदान - सर्व प्रकारची वाहने.