कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल १ आॅक्टोबरला पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 05:34 PM2018-09-04T17:34:17+5:302018-09-04T17:38:25+5:30
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा सुरू होण्यासाठी किमान महिना लागणार आहे.
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायीचे काम पुन्हा सुरू होण्यासाठी किमान महिना लागणार आहे. सप्टेंबर महिन्याभरात आणखी एकदा पूर आल्यास, केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ होईल, यामुळे ठेकेदाराने काम पुन्हा सुरू करण्याचा मुहूर्त १ आॅक्टोबर धरला आहे.
कोल्हापूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा शिवाजी पूल असून, तो अरुंद व कालबाह्य झाल्याने नवीन पर्यायी पूल शेजारी उभारण्याचे काम सुरू आहे; पण विविध अडथळ्यांच्या शर्यतीनंतर या पर्यायी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊन डिसेंबर २०१५ नंतर तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यांत सापडला होता.
अखेर पुरातत्वच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले अथक प्रयत्न आणि सर्वपक्षीय कृती समितीचा रेटा यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू झाले. पुलाच्या उर्वरित कामाचा ठेका गोव्यातील आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ला दिला.
पुलाच्या अखेरच्या कॉलमसाठी खुदाई करताना पाया न लागणे व त्यानंतर पुलाच्या पाणी पातळीच्या चुकीच्या मोजमापावरून वाद उफाळला; त्यामुळे पुलाचे डिझाईन बदलण्याची नामुष्की आली. दरम्यान, पंचगंगा नदीला पूर आल्याने पाया खुदाईत टाकलेल्या काँक्रीटवर पुराचे पाणी आल्याने काम ठप्प झाले. ते बंदच आहे.
सद्या पूर ओसरला असला तरीही प्रतिवर्षाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता ठेकेदार एन. डी. लाड यांनी गृहीत धरली; त्यामुळे पुन्हा काँक्रीट वाहून जाऊ नये, यासाठी हे काम दि. १ आॅक्टोबरला सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर नदी पात्रात रस्ता करून तेथे कामगार छावणी उभारण्यात येणार आहे. तेथेच कॉलमसाठी सळई, आदी साहित्य उतरण्यात येणार आहे.
नवा पूल ३१ जानेवारीपर्यंत खुला
जिल्हा प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात ठेकेदाराला पुलाच्या कामाची वर्क आॅर्डर दिली. काम २८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची अट आहे; पण अधिकाऱ्यांतील अंतर्गत वाद, नदीचा पूर यामुळे वेळ वाढल्याने हे काम ३१ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करून पूल रहदारीस खुला करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराचे आहे.
पाऊस थांबला असला तरीही पुढील काम नदीपात्रात आहे; त्यामुळे पुन्हा पुराच्या पाण्याचा धोका उद्भवू शकतो. नुकसानीला सामोरे जाण्यापेक्षा काहीवेळ थांबून १ आॅक्टोबरपासून काम पूर्ववत सुरू ठेवून पुढील तीन महिन्यांत पूर्ण करू.
- एन. डी. ऊर्फ बापू लाड,
ठेकेदार, आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि.